Success Story: श्रीधर ओगले यांनी बनवला ऐंशी प्रकारचा कोकणमेवा; वर्षाला ७० लाखांची उलाढाल

special story of farmer in kokan shridhar ogale he received 70 lakh rupees on his farming business in sindhudurg
special story of farmer in kokan shridhar ogale he received 70 lakh rupees on his farming business in sindhudurg

सिंधुदुर्ग : कोकण म्हंटल की हापूस, काजू आणि माशाची पर्वणीच.. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देवगड आणि हापूस हे मिळत जुळत गणित.. जितकी देशभरात याला मागणी तितकीच जगभर त्याची प्रसिद्धी आहे. याच तालुक्यातील बागायतदार श्रीधर पुरोषोत्तम ओगले यांनी आपला प्रक्रिया उद्योग सूरु केला. आवश्यक ते सर्व तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा वापर करून 'रेडी टू कुक', 'रेडी टू इट' आशा उत्पादनांची बाजारपेठ उपलब्ध केली. कोकणातील महत्त्वाची फळे व भाज्या यांवर प्रक्रिया करून तब्बल ८० उत्पादनांची निर्मिती  करत वर्षाला ७० लाखांची उलाढाल करत आहेत.

बदलते हवामान आणि वाढते दर यामुळे शेतीत समस्या तयार झाल्या. त्यातूनच त्यांनी प्रकिया उद्योगात उतरण्याचे ठरवले. याचा पहिला प्रयोग त्यांनी १९८० मध्ये केला. त्यांच्याकडे हापूस आंब्याची सुमारे २००० झाडे आहेत. त्यापासुन त्यांनी आमरसचे उत्पादन घेतले. हापूस आमरस तयार केल्यानंतर पॅकिंग मशिनही खरेदी केले. मात्र योग्य सल्लागार न मिळाल्याने पहिला प्रयत्न असफल ठरला. परंतु निराश न होता एकीकडे आंबा बागेत काम करीत असताना दुसरीकडे प्रकिया उद्योगाचा ते बारकाईने अभ्यास करू लागले. पुढील वर्षी पुन्हा आमरस बनवून बाटलीबंद करण्याचा प्रयत्न केला. त्यात ५० टक्के यश मिळाले. एकेक अनुभव गाठीशी बांधत ते आपले काम नेटाने करु लागले. 

प्रकल्पघराची उभारणी

प्रकिया उद्योगासाठी पुरेशी जागा असावी या हेतूने १९८५ मध्ये प्रकल्पघराची उभारणी केली. त्यासाठी शासनाचे विविध परवाने मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. पाच वर्षातच म्हणजे १९९० मध्ये त्यांच्याकडील आमरस, जॅम या उत्पादनांना बाजारपेठेत मागणी वाढली. 

वर्षभर कोकणमेव्याचा आनंद

आंबा, फणस, करवंद, जांभूळ यासह कोकणातील विविध फळांची चव फक्त विशिष्ट हंगामात चाखता येते. ग्राहकांना कोकणमेवा बारमाही उपलब्ध करून दिला तर त्याचा मोठा फायदा ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना देखील होईल या हेतूने काम सुरू केले. त्यातून फणसपोळी, फणस केक, कोवळ्या फणसाची भाजी अशी उत्पादने सुरू केली. पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह राज्याच्या विविध भागांमध्ये  चांगली मागणी मिळाली. पुढे २००७ मध्ये त्यांनी साडेपाच लाख रुपये खर्चून रायपनिंग चेंबर उभारले. त्यात पिकविलेल्या आंब्याची दोन डझन पेटीद्वारे थेट विक्री करून नवी संकल्पना राबविली. 

रिटॉर्ट पाऊच पॅकिंग

उत्पादन कितीही चांगले असले तरी त्याचा टिकाऊपणा आणि पॅकिंग खूप महत्त्वाचे असल्याचे ओगले यांनी ओळखले. त्या अनुषंगाने अभ्यास सुरू केला. त्यावेळी रिटॉर्ट पाऊचचा पर्याय पुढे आला. अधिक चौकशी केल्यानंतर गुरगाव (हरियाना) येथून ते उपलब्ध केले. संबंधित यंत्र पुणे येथून खरेदी केले. आपली उत्पादने रिटॉर्ट पाऊचमधून ग्राहकांना देण्यास सुरवात केली. त्याचा चांगला परिणाम म्हणजे उत्पादनांना बाजारपेठेतून मागणी वाढली. मग विविध मालवणी मसाले, लोणचे, फळांचे सरबत अशी उत्पादनात वाढ केली. आवळा, जांभूळ, करवंद आदींवरही प्रकिया सुरू केली.

उत्पादनांची पर्वणी 

  • रेडी टी कूक व रेडी टू इट यांची श्रेणी
  • फणस, केळफूल, टाकळा, अळू, सुरण आदींची भाजी
  • सरबत- आंबा, कोकम, कैरी, आवळा
  •  लोणचे- आंबा, आवळा, मिरची, माईणमुळा, करवंद, जांभूळ क्रश
  • मसाले आणि पीठ- मालवणी मसाला, सांडगी मिरची, कोहळ्याचा सांडगा, मेतकुट
  • कारली, सुरण, बीट, गाजर यावरही प्रकिया
  • व्हॅक्यूम फ्राय- फणस वेफर्स, भेंडी, गाजर, बीट, रताळे, कोकोनट क्रंच व डिहायड्रेट

अवघ्या पाच ते सहा मिनिटांत भाजी तयार होत असल्यामुळे 'रेडी टू कूक' उत्पादनांना मागणी वाढली. २०११-१२ मध्ये ज्यूस तयार करणारे अत्याधुनिक यंत्र घेतले. त्याच्या साहाय्याने कोकणातील अनेक फळांची रसनिर्मिती केली. ओगले यांच्या ८० उत्पादन निर्मितीत कोणत्याही रसायनांचा वापर नाही.

रानभाज्यांवर प्रकिया 

कोकणात औषधी गुणधर्म असलेल्या अनेक रानभाज्या आहेत. त्यामध्ये सहज उपलब्ध होतील अशा टाकळा, अळू, भारंगी, काटला यासारख्या अनेक भाज्या आहेत. आजही लोक त्या चवीने आणि आवडीने खाण्यास पसंती देतात. परंतु त्या ठराविक हंगामात उपलब्ध होत असल्याने प्रकिया करून त्या वर्षभर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ओगले यांनी केला. यापैकी टाकळा आणि अळूच्या तयार भाज्या ग्राहकांपर्यंत पोचविल्या. भविष्यात उर्वरित भाज्यांवर प्रकिया करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. 

सध्या आवश्‍यक यंत्रसामुग्री व देवगड येथील कॉमन फॅसिलिटी सेंटरची मदत घेऊन सुमारे २५ लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक त्यांनी केली. वार्षाकाठी यातून त्यांना ७० लाख रुपये मिळतात. त्यांच्या या उद्योगामुळे थेट २० ते २२ स्थानिक महिला आणि कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. याशिवाय शेकडो लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराची संधी ओगले यांनी उपलब्ध करून दिली आहे.
 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com