कोकणात आहे अस एक गाव जिथे नवरात्रोत्सवात होतो किरणोत्सव

अमित पंडित
Saturday, 24 October 2020

एकाच देवघरात दोन देवींवर एकत्रित नवरात्र संस्कार केले जातात. या प्रथेला ३०० वर्षांचा इतिहास आहे. 

साखरपा (रत्नागिरी) : येथील सरदेशपांडे यांच्या घरातील नवरात्र हे चौसोपी वाड्यातील नवरात्र म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. एकाच देवघरात दोन देवींवर एकत्रित नवरात्र संस्कार केले जातात. या प्रथेला ३०० वर्षांचा इतिहास आहे. 

कोंडगाव येथील सरदेशपांडे घराणे हे पूर्वापार खोत म्हणून प्रसिद्ध होते. त्या घरातील नवरात्र हे चौसोपीतील नवरात्र म्हणून प्रसिद्ध आहे. या घराण्याची अंबाबाई ही कुलदेवता. या घरात मूळ सरदेशपांडे आणि नजीकच्या कनकाडी येथील पंडित घराण्याची देवी अशा दोन देवी आहेत. एकाच देवघरात दोन देवी असणे आणि त्यांचे एकत्रित नवरात्र असणे ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे.

हेही वाचा - सावधान ! तिलारीच्या कालव्यात वाढतोय मगरींचा मुक्काम -

नवरात्रात या दोन्ही देवींना पांढऱ्या साड्यांचा साज चढवला जातो. अन्य कोणत्याही रंगाच्या साड्या नेसवल्या जात नाहीत. या दोन्ही देवी चतुर्भुज आहेत, तर एका देवीच्या डोक्‍यावर शिवलिंग आणि नाग आहे तर पायाजवळ सिंह आहे. या नवरात्रातील एक वैशिष्ट्य म्हणजे देव्हाऱ्यावर होणारा किरणोत्सव. सरदेशपांडे यांच्या देवघराची रचना अशी आहे, की वर्षातून दोन वेळा मावळत्या सूर्याची किरणे घरात थेट येऊन ती देवघरात पडतात आणि त्यामुळे देवांवर किरणोत्सव घडतो. त्यापैकी एक दिवस 
नवरात्रातील असतो.

घडशी कुटुंबीय अंबाबाईचे उपासक

चौसोपीतील नवरात्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तीन पिढ्यांची सनई परंपरा. सांगली जिल्ह्यातील विटा गावचे घडशी कुटुंबीय हे अंबाबाईचे उपासक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी १९१९ पासून चौसोपीत सनईची सेवा करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यानंतर त्यांच्या तीन पिढ्या ही परंपरा चालवत होत्या. नऊ दिवस दिवसातून तीन वेळा ते सनई वाजवून देवीची सेवा करत. १९९५ च्या दरम्यान ही परंपरा बंद पडली.

हेही वाचा - प्रविण दरेकर पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर -

 

संपादन - स्नेहल कदम 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special story of konkan of mr. sardesai home sunset rays in navratri days in ratnagiri