गोव्यातील मगोत बंडाचे वारे

lavu mamledar
lavu mamledar

पणजी - गोव्यातील सर्वात जून्या असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात पुन्हा बंडाचे वारे वाहू लागले आहेत. आज पक्षाचे सरचिटणीस लवू मामलेदार यांनी अध्यक्ष दीपक ढवळीकर हे एकाधिकारशाही गाजवतात असा आरोप पत्रकार परीषदेत केला. मामलेदार म्हणाले, 2017 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठींबा देण्याचे पत्र अध्यक्षांनी पक्षाच्या केंद्रीय समितीला विश्वासात न घेताच दिले होते. असे करून त्यांनी राज्यपालांची फसवणूक केली आहे.

मगोत बंडाची ही पहिली वेळ नव्हे. पक्षाचे संस्थापक आणि गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कन्या माजी मुख्यमंत्री स्व. शशिकला काकोडकर यांनीही मागे पक्षाच्या विरोधात बंड करत भाऊसाहेब बांदोडकर गोमंतक पक्ष स्थापन केला होता. मगो पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन झाला असाही पेच याअगोदर निर्माण झाला होता तत्कालीन आमदार बाबुसो गावकर व अॅड रमाकांत खलप यांनी सही दिली पण पक्ष दिला नाही म्हणत पक्षाचे अस्तित्व कायम राखले होते. गोवा पोर्तुगीज सत्तेतून 1961 मध्ये मुक्त झाल्यानंतर 1963 मध्ये संघराज्याचे लोकनियुक्त सरकार याच पक्षाने स्थापन केले होते. तोवर आजपर्यंत प्रत्येक विधानसभेत या पक्षाने आपले अस्तित्व कायम राखले आहे. विद्यमान विधानसभेत या पक्षाचे तीन सदस्य आहेत.

गेली काही वर्षे सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर या बंधूंची मगोवर पकड आहे. बहुजन  समाजाचा असलेला हा पक्ष आता बहुजनांचा  राहिलेला नाही अशी चर्चा गेली काही वर्षे ऐकू येत होती. मात्र ढवळीकर यांना उघड जाहीर आव्हान देण्याचे धाडस कोणी केले नव्हते. ते आज मामलेदार यांनी केले आहे. फोंडा या मतदारसंघाचे मागील विधानसभेत मामलेदार प्रतिनिधीत्व करत होते. 2107 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव होऊन तेथे कॉंग्रेसचे रवी नाईक निवडून आले. आता फोंडा पालिकेची निवडणूक आहे. त्यात आपल्याला डावलले गेल्याची भावना मामलेदार यांना छळू लागली आहे. मागील निवडणूकीत पणजीत मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात लढलेले डॉ. केतन भाटीकर यांना मगोने फोंडा पालिका निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. त्याशिवाय शिवसेनेतून हाकालपट्टी केलेले माजी राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही मगोत प्रवेश देण्यात आला आहे. यामुळे मगोत आपले खच्चीकरण होत आहे असे वाटून मामलेदार यांनी थेट अध्यक्षांवर तोफ डागली आहे.

मगोचे नेते आणि दीपक ढवळीकर यांचे ज्येष्ठ बंधू सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर हे विद्यमान सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आहेत. ते दोन्ही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करून मुख्यमंत्री होतील अशीही मध्यंतरी चर्चा होती. तशा राजकीय हालचालीही सुरु झाल्या होत्या. मात्र सरकार अस्थिरतेची कल्पना आल्याने गोव्यातील भाजप, मगो, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांच्या आघाडी सरकारचे शिल्पकार असलेले केंद्रीयमंत्री नितीन गडकरी धावून आले आणि त्यांनी आपल्या पद्धतीने हे सारे थोपवले आहे. या आमदारांनी मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यास मगोतील मामलेदारांसह अनेकांचा विरोध आहे. त्यामुळे मामलेदार यांनी आज जाहीर आरोप करण्यामागे पुन्हा मगो भाजपमध्ये विलीन करण्याच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत का असा संशय़ घेण्यास जागा निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com