एसटी जळून खाक; 57 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 September 2019

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ वडपाले येथे सकाळी सातच्या सुमारास एसटी बस जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत 57 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर वडपाले येथे सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास एसटी बस जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत एकाही प्रवाशांला दुखापत झाली नसून 57 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.

यावेळी महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली. इचलकरंजी आगाराची कोल्हापूर विभाग बस क्रमांक MH 20 BL 4209 हि मुंबई-दहिवली मार्गावर धावत असताना वडपाले गावाजवळ ही घटना घडली.

बसला आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश भक्तांना घेऊन ही बस मुंबईतील परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे जात असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास माणगावजवळ वडपाले येथे बसने अचानक पेट घेतला. यावेळी बसमध्ये 57 प्रवासी होते. सुदैवाने त्यांना तातडीने बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे ते थोडक्यात बचावले, मात्र त्यांचे सामान जळून खाक झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, सर्वजण गणेशोत्सवासाठी गावी निघाले होते. दरम्यान अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST burns in Konkan; Passenger briefly rescued