esakal | एसटीला ‘अच्छे दिन’
sakal

बोलून बातमी शोधा

kankavali

एसटीला ‘अच्छे दिन’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली : गेल्या काही महिन्यानंतर एसटी महामंडळाला आता पुन्हा एकदा सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या एसटीला आता गणेशोत्सवातील प्रवाशांच्या हजेरीने दिलासा मिळू लागला आहे. आज येथील एसटी बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी बससेवा बराच काळ बंद होती. त्यातच परराज्यातील वाहतूकही ठप्प झाली होती. अलीकडेच एसटीच्या बस गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गावातली एसटी बस वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागात अजूनही एसटीला पर्यायी व्यवस्था नाही.

अनेक गावांमध्ये एसटी हेच एकमेव वाहतुकीचे साधन आहे. मात्र, कोरोना संकट कालावधीत सर्वसामान्य जनतेनेही पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे गावात एसटी सोबतच सहा आसनी आणि तीन आसनी रिक्षा ही धावू लागल्या; पण अनेक गावे अशी आहेत, जिथे एसटी शिवाय दुसरी वाहतूक सुविधा नाही.

अनेक नागरिकांना परवडणारे हे एसटी बसचे प्रवासी साधन आहे. त्यामुळे आजही जिल्ह्यातील बहुतांशी प्रवासी हे एसटीवरच अवलंबून आहेत. कोरोना काळात बेरोजगारी वाढली आहे. स्वस्त आणि मस्त प्रवासासाठी प्रवाशांना एसटीचा आधार घ्यावा लागत आहे. सर्वसामान्यांची एसटी पुन्हा एकदा रस्त्यावर धावू लागली आहे. सध्या शाळा, महाविद्यालयांना सुटी आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये येणारे प्रवासी हे एसटीचे उत्पन्नाचे साधन मानले जाते.

प्रमुख गावांमध्ये सुविधा

आता प्रमुख गावांमध्ये एसटी बससेवा सुरू झाली आहे. गणेशोत्सव कालावधीत मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांना एसटीने प्रवास करावा लागला आहे. त्यामुळे एसटीला चांगले दिवस येऊ लागले आहेत. प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे येथील बस स्थानकात प्रवाशांनी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

loading image
go to top