तब्बल साठ दिवसानंतर धावली एसटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

आगारातून आज बसफेरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सकाळी 7 वाजून 10 मिनिटाने देवगड नांदगांव मार्गावरून कणकवली बसफेरी सोडण्यात आली.

देवगड (सिंधुदुर्ग) - कोरोना आणि पर्यायाने झालेल्या लॉकडाउननंतर तब्बल साठ दिवसांनी आज देवगड नांदगाव मुख्य रस्त्यावरून कणकवलीपर्यंत बस धावली. आज दिवसभरात एकाच गाडीच्या चार फेऱ्या झाल्या. लॉकडाउननंतर एसटी सुरू होण्याचा पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांचा अल्प प्रतिसाद होता. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 22 मार्चला जनता कर्फ्यू होता. त्यानंतर लगेचच सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्यावेळेपासून येथील आगाराची एसटी सेवा बंद होती. एसटी सेवा बंद राहिल्यामुळे महामंडळालाही आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. सुमारे दोन महिने एसटी सेवा बंद राहिल्यानंतर जिल्हातंर्गत एसटीसेवा सुरू करण्याला हिरवा कंदील प्रशासनाकडून दाखवण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर येथील आगारातून आज बसफेरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सकाळी 7 वाजून 10 मिनिटाने देवगड नांदगांव मार्गावरून कणकवली बसफेरी सोडण्यात आली.

ही गाडी कणकवली येथून 9 वाजून पाच मिनिटांनी सुटून येथील आगारात आली. त्यानंतर पुन्हा दुपारी दोन वाजून पाच मिनिटाने येथून सुटून कणकवली येथून पावणे चारला सुटून इकडे आली. एकाच गाडीच्या चार फेऱ्या झाल्या. चालक सुहास शेटगे आणि वाहक योगेश देशमुख यांनी फेऱ्या पूर्ण केल्या. स्थानकप्रमुख गंगाराम गोरे यांच्या उपस्थितीत गाडी मार्गस्थ करण्यात आली.

यावेळी विकास केळकर, लहू सरवदे, अण्णा मिराशी उपस्थित होते. लॉकडाउननंतर पहिल्यांदाच येथून आगारातून एसटी गाडी धावली. आजच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. शासनाच्या निर्णयानुसार गाडीतून 65 वर्षावरील व्यक्‍तीस तसेच 10 वर्षाखालील बालकांना आणि गरोदर मातांना प्रवास करता येणार नाही. चार फेऱ्यांमधून 213 किलोमीटर अंतर झाल्याचे श्री. गोरे यांनी सांगितले. 
 

हजाराचे उत्पन्न 
येथील आगारातून कणकवलीसाठी सोडण्यात आलेल्या गाडीला एकूण चार फेऱ्यांमधून एक हजार 10 रूपये इतके उत्पन्न मिळाले. गाडी सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उद्यापासून प्रवाशी वाढतील असा अंदाज व्यक्‍त करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: st bus service devgad konkan sindhudurg