एसटी सुरु, पण डिझेलचा खर्च `इतका` अन् मिळाले `इतके`

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

दापोली बसस्थानकातून एसटी सेवा सुरू झाली खरी पण हा व्यवसाय आतबट्याचा ठरला आहे. वाहतूकीसाठी डिझेलचा खर्च 21 हजार झाला पण तिकीट विक्रीतून फक्‍त 2 हजार रुपयेच मिळाले आहेत.

दाभोळ ( रत्नागिरी ) - दापोली बसस्थानकातून एसटी सेवा सुरू झाली खरी पण हा व्यवसाय आतबट्याचा ठरला आहे. वाहतूकीसाठी डिझेलचा खर्च 21 हजार झाला पण तिकीट विक्रीतून फक्‍त 2 हजार रुपयेच मिळाले आहेत. यामुळे हा तोट्याचा धंदा किती दिवस चालणार याची चर्चा सुरू झाली आहे. 

दोन महिन्यानंतर एसटी सुरू झाली असून पहिल्या दिवशी प्रशासनाच्या समन्वयाअभावी दापोली बस स्थानकातून एकही बस सुटली नाही. दुसऱ्या दिवशी दापोली बसस्थानकातून सकाळी रत्नागिरी बस सुटली. रत्नागिरी येथे जाण्यासाठी प्रवासी संख्या कमी असल्याने तिकीट विक्रीतून केवळ 750 रुपये मिळाले.

रत्नागिरी - दापोली प्रवासात केवळ 150 रुपयांचा तिकीट विक्रीतून व्यवसाय झाला. दापोली - चिपळूण ही बस प्रवासी नसल्याने खेडपर्यंत जाऊन परत आली, तर दापोली - खेड व दापोली - मंडणगड प्रवासात मोजकेच प्रवासी होते. 

तोट्यातील वाहतून तसेच एसटी चालक व वाहक तसेच बसस्थानकात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनाचा खर्चही अधिक आहे. रविवारी (ता. 24) सकाळी सुटणारी दापोली - रत्नागिरी ही बस प्रवासीच नसल्याने रद्द करण्यात आली. केवळ दापोली - खेड, दापोली - मंडणगड बसेसच दापोली बसस्थानकातून सोडण्यात आल्या.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Diesel Cost 21 Thousand And Tickets Sale Only 2 Thousand