रत्नागिरीत राज्यस्तरीय ओपन पेअर्स ब्रिज स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

एक नजर

  • रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशन व इंडियन ऑइल यांच्यावतीने राज्यस्तरीय ओपन पेअर्स ब्रिज स्पर्धेचे आयोजन
  • येत्या शनिवारी (ता. 15) व रविवारी (ता. 16 ) टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये स्पर्धा
  • संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष देव यांची माहिती

रत्नागिरी - जिल्हा ब्रिज असोसिएशन व इंडियन ऑइल यांच्यावतीने राज्यस्तरीय ओपन पेअर्स ब्रिज स्पर्धेचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. 15) व रविवारी (ता. 16 ) टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये स्पर्धा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष देव यांनी दिली.

संस्थापक सदस्य मोहन दामले, उपाध्यक्ष माधव आगाशे, स्पर्धाप्रमुख अभय लेले उपस्थित होते. या स्पर्धेला मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, गोवा, बेळगाव, सांगली आदी ठिकाणचे नामवंत ब्रिज खेळाडू सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र ब्रिज असोसिएशनने या स्पर्धेला राज्यस्तरीय दर्जा दिला आहे. स्पर्धेचे उद्घाटन 15 जूनला सकाळी साडेनऊ वाजता इंडियन ऑइलच्या मार्केटिंग विभागाच्या अधिकारी अंजली भावे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर तीन सत्रात सुमारे 50 ते 60 डाव खेळले जातील. त्यातून 30 पेअरची अंतिम गटात निवड करण्यात येईल. 16 जूनला अ व ब गट अशी पेअरची विभागणी होऊन पुन्हा 55 ते 60 डाव खेळवले जातील. त्यानंतर सायंकाळी उशिरा विजेत्यांना गौरवण्यात येईल.

स्पर्धेत अंदाजे 140 खेळाडू सहभागी होणार आहेत. एकूण पन्नास हजार रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे संचालक म्हणून मुंबईचे दक्षिणदास काम पाहणार आहेत तर कॉम्प्युटर स्कोअरर म्हणून विश्‍वनाथ काम पाहतील. पत्ते वाटणे, डाव ठरवणे, निकाल आदी सारे काम संगणकीकृत असणार आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अभय पटवर्धन, विश्‍वनाथ तथा बापू वैशंपायन, सचिन जोशी, सचिन मुळ्ये, रामचंद्र सोहनी मेहनत घेत आहेत.

ब्रिज हा बुद्धिवंतांचा खेळ
ब्रिज हा खेळ पत्त्यांचा असला तरी जुगार नाही. अनेकांचा हा गैरसमज आहे. त्यामुळे युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी व खेळाचा प्रसार करण्यासाठी लवकरच प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. स्पर्धेत एकाच वेळी सार्‍यांना सारखीच पाने दिली जातात व 6 मिनीटांत कोण कसे खेळतो यावर गुणांकन ठरते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state level open pair bridge competition in Ratnagiri