आरक्षणाबाबत आवाज बुलंद, शिवरायांच्या जयघोषाने परिसर दणाणला

संतोष कुळकर्णी
Thursday, 17 September 2020

आरक्षणाबाबत राज्यकर्त्यांमध्ये इच्छाशक्‍तीचा अभाव असल्याची टिपण्णी समन्वयक संदीप साटम यांनी माध्यमांशी बोलताना केली. 

देवगड (सिंधुदुर्ग) - आरक्षणावरून तालुक्‍यातील सकल मराठा समाजाने आवाज आज बुलंद केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाबरोबरच मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केली. राज्याने मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करुन स्थगिती उठवण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्याना पाठवण्यासाठी तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे सुुपुर्त केले.

आरक्षणाबाबत राज्यकर्त्यांमध्ये इच्छाशक्‍तीचा अभाव असल्याची टिपण्णी समन्वयक संदीप साटम यांनी माध्यमांशी बोलताना केली. 
मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी काल तालुक्‍यातील सकल मराठा समाज येथील तहसील कार्यालयात एकवटला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष करण्यात आला. समन्वयक संदीप साटम, उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, शामराव पाटील, किसन सुर्यवंशी, संकेत लब्दे, सदानंद देसाई, राजू भुजबळ, पंकज दुखंडे, शैलेश लोके, प्रकाश सावंत, सुरेश घाडी, बाळा कदम, केदार सावंत, सत्यवान कदम, राजाराम राणे उपस्थित होते. मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यासाठी तहसीलदारांकडे देण्यात आले. 

या आहेत मागण्या 
चालू शैक्षणिक वर्षात मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने त्वरीत पावले उचलावीत, आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात पावले उचलावीत, न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत नोकरीसंदर्भात निघालेल्या जाहिरातींची अंमलबजावणी करून भरती, प्रवेश प्रक्रिया, एस. ई. बी. सी. प्रमाणे व्हाव्यात. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statement to Tehsildar regarding Maratha reservation