सिंंधुदुर्गातील 'त्या' उड्डाणपूल कामाच्या दर्जाची तज्ज्ञांकडून तपासणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

उड्डाणपुलाचे पिलर आणि स्लॅबचे बांधकाम मजबूत असल्याचा प्राथमिक अंदाज

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली शहरात उभारणी होत असलेल्या उड्डाणपूल कामाच्या दर्जाची तपासणी आज तज्ज्ञांकडून करण्यात आली. यामध्ये उड्डाणपुलाचे पिलर आणि स्लॅबचे बांधकाम मजबूत असल्याचा प्राथमिक अंदाज तपासणी करणार्‍या कंपनीने व्यक्त केला. यावेळी महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सलीम शेख उपस्थित होते.

हेही वाचा - नाणारबाबत आमचा निर्णय तोच ; उदय सामंत 

गेल्या महिन्यात कणकवलीत उड्डाणपूल जोड रस्त्याची भिंत कोसळली होती. त्यानंतर उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला होता. त्यामुळे चौपदरीकरण कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यानंतर शहरवासीयांनी एकत्र येत उड्डाणपुलासह चौपदरीकरण कामाच्या दर्जाच्या तपासणीची मागणी केली होती. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनीही या मागणीसाठी उपोषण छेडले होते.

कणकवली शहरात एस. एम. हायस्कूल ते नरडवे तिठ्यापर्यंत उड्डाणपुलाचे पिलर बांधण्यात आले. तर बसस्थानक ते नरडवे तिठ्यापर्यंत या पिलरवर स्लॅब टाकण्यात आले आहे. या बांधकामाची दर्जा तपासणी आज कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

हेही वाचा -  किल्ले संवर्धनाबाबत संभाजी राजेंची तळमळ, कोकणाबाबत म्हणाले...

नॅशनल अ‍ॅक्रिडेशन ब्युरो ऑफ टेस्टिंगची मान्यताप्राप्त असलेल्या बालाजी टेस्ट हाउस प्रा. ली. कंपनीने शहरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे पिलर आणि स्लॅबची तपासणी केली. रीबाऊंड हॅमर अल्ट्रासॉनिक पल्स व्हॅलोसिटी तंत्राद्वारे ही तपासणी करण्यात आली. यात करारानुसार आवश्यक असलेल्या क्षमतेपेक्षाही जास्त मजबूत बांधकाम झाल्याचे या तपासणीत प्रथमदर्शनी दिसून आल्याची माहिती तपासणी करणार्‍या कंपनी प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे. यावेळी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्यासह उपअभियंता विजय पोवार, आरटीफॅक्ट कंपनीचे एन के सिंग, डीबीएल चे प्रोजेक्ट मॅनेजर गौतम, उदय चौधरी, कनिष्ठ अभियंता श्री.मणेर, श्री.कोळगे,नाळवे आदी  उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: status of work of bridge checked by experts in kankavli