सावंतवाडी टर्मिनसवर जनशताब्दी थांब्याचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 August 2019

सावंतवाडी - कोकण रेल्वे मार्गावरील उत्तर-दक्षिण जोडणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना सावंतवाडी टर्मिनसवर थांबा मिळावा म्हणून प्रयत्न आहेत. पर्यटनदृष्ट्या सावंतवाडी टर्मिनस विकसित व्हावे आणि प्रवाशांनाही पायाभूत सुविधा देऊन रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्न आहेत, अशी माहिती राज्याचे गृह, नियोजन, वित्त राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सावंतवाडी - कोकण रेल्वे मार्गावरील उत्तर-दक्षिण जोडणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना सावंतवाडी टर्मिनसवर थांबा मिळावा म्हणून प्रयत्न आहेत. पर्यटनदृष्ट्या सावंतवाडी टर्मिनस विकसित व्हावे आणि प्रवाशांनाही पायाभूत सुविधा देऊन रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्न आहेत, अशी माहिती राज्याचे गृह, नियोजन, वित्त राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सावंतवाडी टर्मिनसवर जनशताब्दी गाडीला थांबा देण्यात आला. या गाडीचा प्रारंभ पालकमंत्री केसरकर व खासदार विनायक राऊत यांनी झेंडा दाखवून केला. यावेळी पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी सभापती पंकज पेडणेकर, सरपंच प्रमोद गावडे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी. के. सावंत, कोकण रेल्वेचे रिजनल मॅनेजर उपेंद्र शेंडे, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे, अशोक दळवी, नारायण राणे, दिलीप सोनुर्लेकर, बाळू परब, उपसभापती संदीप नेमळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते आदी उपस्थित होते. 

केसरकर म्हणाले, ‘‘जनशताब्दी व अन्य महत्त्वाच्या गाड्यांना सावंतवाडीत थांबा मिळावा म्हणून खासदार राऊत व मी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना भेटलो. गौरी-गणपती सणांत जनशताब्दीला थांबा मिळत आहे. आता उत्तर-दक्षिण जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, म्हणून प्रयत्न राहतील. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर नऊ कोटींचा रेल हॉटेल प्रकल्प मंजूर केला आहे. या हॉटेलसाठी पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला; परंतु रेल्वेच्या नवीन व्यवस्थापकीय संचालकांनी हॉटेल बांधण्यासाठी रेल्वेच पुढाकार घेईल, असे म्हटले आहे. त्यामुळे हे हॉटेल बांधल्यानंतर ते निविदा स्वरूपात चालविण्यास देण्याचा मनोदय रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.’’

रेल्वेस्थानकावर रिक्षा उन्हात उभ्या राहत आहेत. त्यांना शेड देण्याचा प्रयत्न आहे. रिक्षा सुविधा देताना बॅटरी ऑपरेटर कार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून बॅटरी ऑपरेटर कार चालवल्या जातील, असेही केसरकर म्हणाले. यावेळी कोकण रेल्वेचे रिजनल मॅनेजर उपेंद्र शेंडे यांनी कोकण रेल्वे स्थानकावर निर्माण केलेल्या सोयी सुविधा व गाड्यांविषयी माहिती दिली. यावेळी येथे रेल्वे टर्मिनसवर दीड वाजता जनशताब्दी एक्‍सप्रेस दाखल झाली. मोटरमन मोहन खेडेकर, असिस्टंट संजय वराडकर यांनी कोकण रेल्वेला हार घालून स्वागत केले.

रेल्वेचे दुपदरीकरण गरजेचे
रेल्वेचे दुपदरीकरण अचानक होऊ शकत नाही. ते टप्प्याटप्प्याने करणे गरजेचे आहे. यासाठी भारतीय रेल्वेकडे पंधरा हजार कोटी रुपये आवश्‍यक आहेत. पहिल्या टप्प्यात पनवेल ते रोहा, दुसऱ्या टप्प्यात रोहा ते वीर असे दुपदरीकरण होऊ शकते. यापुढे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला अधिकाधिक गाड्या थांबवण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. सावंतवाडीबरोबर वैभववाडी स्टेशनलाही तेथील प्रवाशांची संख्या पाहता गाड्या थांबवण्याचे विचाराधीन आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop to Janshatapdi on Sawantwadi terminals