मंडणगड तालुक्यातील वादळग्रस्तांनी व्यक्त केला `हा` धोका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

याबाबत जावळे येथील मूर्तिकार महेश भानसे व शेती अभ्यासक संजय रेवाळे यांनी "सकाळ'शी बोलताना आपल्या व्यथा बोलून दाखवल्या. पावसात राहण्याची अडचण निर्माण झाल्याने नुकसानग्रस्त घरांची तात्पुरती डागडुजी करून व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मंडणगड ( रत्नागिरी ) - "निसर्ग' चक्रीवादळात तालुक्‍यातील घरांचे नुकसान झाले. प्राथमिक पंचनामे केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून तात्पुरती डागडुजी करून राहण्याची व्यवस्था करा, असे सांगितल्याने तालुक्‍यातील नागरिकांनी तशी तजवीज केली. आता पुनर्सर्वेक्षण करताना झालेले नुकसान दिसून येत नसल्याचा सूर अधिकारी आळवू लागल्याने झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यापासून नागरिकांना वंचित राहावे लागण्याची शक्‍यता आहे. 

याबाबत जावळे येथील मूर्तिकार महेश भानसे व शेती अभ्यासक संजय रेवाळे यांनी "सकाळ'शी बोलताना आपल्या व्यथा बोलून दाखवल्या. पावसात राहण्याची अडचण निर्माण झाल्याने नुकसानग्रस्त घरांची तात्पुरती डागडुजी करून व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पूर्णतः नुकसान झालेल्या घरांची अवस्था बिकटच झाली. नागरिकांनी पंचनामे झाल्यानंतर तात्पुरती डागडुजी करून आपल्या राहण्याची व्यवस्था केली.

आता तिसऱ्या वेळी पुनर्सर्वेक्षण करण्यात येत असून उद्‌ध्वस्त घरे तशीच न राहिल्याने नुकसानीची तीव्रता कळून येत नाही. तसेच पंचनामा करणारे अधिकारी बदलल्याने आधीच्या नुकसानीबाबत शंका निर्माण होत आहेत. काहीजणांकडे नुकसानीचे फोटो असूनही हे ते घर नव्हेच अशी उत्तरे मिळत असल्याचे महेश भानसे यांनी सांगितले. त्यामुळे पीडित दिरंगाई आणि कामाबाबत नाराजी व्यक्त करू लागले आहेत. आम्ही घरांची डागडुजीच केली नसती तर आहे तो आधारही गेला असता अशा भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. 

नागरिकांची नाराजी व तक्रारीचा सूर 
मदतीचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा अशा टप्पेवारीत गावागावांतील ठराविक नागरिकांच्या खात्यात निधी जमा झाला. सगळ्या ग्रामस्थांना निधी मिळालाच नाही, नुकसानाची पंचनाम्यात पूर्ण नोंद करण्यात न आल्याने अपुरा निधी खात्यात वर्ग झाला अशा तक्रारी येत आहेत. या संदर्भातील प्रशासनाची डोकेदुखी आणखीच वाढणार आहे. भरपाई न मिळालेले अनेक नागरिक एकत्र येऊन मंडणगड पंचायत समिती, तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. 

माझ्या चित्रशाळा व त्यातील मूर्तींचे सुमारे 9 लाखांचे नुकसान झाले, मात्र सध्या मला फक्त पंधरा हजारांचीच नुकसानभरपाई मिळाली. अशी परिस्थिती तालुक्‍यातील अनेक नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. 
- महेश भानसे, जावळे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Storm Victims In Mandangad Taluka Express Reactions On Compensation