आत्मविश्‍वासाने जगण्यासाठी मिळाली उभारी ; राजवाडी, दसपटी कुटुंबाने घेतली उंच भरारी

मनोज पवार
Friday, 16 October 2020

राजवाडी, दसपटी येथील कोकरे कुटुंबातील दोन्ही मुलगे अंध असूनही दोघे स्वतःच्या पायावर उभे आहेत. 

चिपळूण (रत्नागिरी) : समाजातील अंध आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन आत्मविश्‍वासाने जगण्यासाठी नॅब संस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राजवाडी, दसपटी येथील कोकरे कुटुंबातील दोन्ही मुलगे अंध असूनही त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच कोकरे कुटुंबीय नॅबविषयी कृतज्ञता व्यक्त करतात.

हेही वाचा - गव्यांच्या कळपाने घेरल्यावरही तो डगमगला नाही ; सिंधुदुर्गातील स्पेशल चाइल्डची संघर्षमय कहाणी -

निवृत्त सैनिक लक्ष्मण कोकरे, पत्नी बायाबाई गृहिणी, शेतीकाम करत. त्यांचे दोन्ही मुलगे अंध. सैन्यातील नोकरी व पत्नी अशिक्षित असल्याने या मुलांकडे फारसे लक्ष देता आले नाही. मुलांच्या या अंधारमय जीवनामुळे पती-पत्नी काळजीत होते. मोठा मुलगा ७५ टक्के तर लहान १०० टक्के अंध. सुरेश हे ते स्वत: चिपळूण शहरात दुधाचे वाटप घरोघरी करतात. सुरेश कोकरे विवाहित असून, डोळस पत्नी सुरेखा त्यांना व्यवसायात मदत करतात. त्यांची तीनही मुले डोळस असून, मुली एफ. वाय. बी. कॉम, दुसरी अकरावी व तिसरा मुलगा दहावीत शिक्षण घेत आहेत.

लहान मुलगा बाबासाहेब कोकरे (वय ३६) १०० टक्के अंध. त्याला शिक्षणात आवड होती. त्याचे प्राथमिकपासून दहावीपर्यंतचे शिक्षण समाजकल्याण अंतर्गत पुण्यात झाले. त्यासाठी नॅब संस्थेने योग्य मार्गदर्शन करून शिक्षण आणि खर्चाची सर्व जबाबदारी उचलली. येथील डी. बी. जे. कॉलेजमध्ये बारावीचे शिक्षण घेऊन नॅबच्या शिष्यवृत्तीवर अंधांसाठी असलेला विशेष डी. एड्‌. कोर्स पुणे येथे करून उस्मानाबाद येथे अंध शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत आहे. नोकरी करतानाच मुक्त विद्यापीठातून पदवी संपादन केली आहे.

 

म्हैस, सिंगलफेज चक्की देऊन

मोठा मुलगा सुरेश (वय ४५), शिक्षण ९ वी झाले. शेतीत काम करायचा, पण लोक अंध म्हणून हिणवतील म्हणून बाहेर जायला लाजायचा. नॅब संस्थेचे संदीप नलावडे हे लहान मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने कोकरे कुटुंबाशी जोडले गेले, त्यांनी धीर दिला. सुरेशचे समुपदेशन करून अंधांसाठी दिल्या जाणाऱ्या विशेष मोबिलिटी ट्रेनिंगसाठी मानसिक तयारी केली. ट्रेनिंगनंतर नॅब संस्थेने ३६ हजार रुपयांची म्हैस, सिंगलफेज चक्की देऊन त्यांना आत्मविश्‍वासाने स्वयंरोजगारात उभे केले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: story of blind two youth career with the help of nab organisation in ratnagiri