अगरबत्ती बनवून दिव्यांग देतोय कुटुंबाला आर्थिकतेचा सुगंध

महेश चव्हाण
Monday, 11 January 2021

हा त्याचा छोटेखानी व्यवसाय कौतुकास पात्र तर आहेच; पण त्याशिवाय शिक्षित बेरोजगार तरुणांसमोर त्याने एक नवा आदर्श घालून दिला आहे. 

ओटवणे (सिंधुदुर्ग) - घरातील गरीब परिस्थितीचा आणि आपल्या व्यंगत्वाची नकारात्मकता न बाळगता आईला मदत करून कुटुंब सावरण्याची केविलवाणी धडपड ओटवणे गावठणवाडी येथील दिव्यांग विद्यार्थी अमोल झिलू मेस्त्री करत आहे. अगरबत्ती घरी बनवून व ती गावातच विकून कुटुंबाला आर्थिकतेचा सुगंध देण्याचा प्रयत्न करत आहे. हा त्याचा छोटेखानी व्यवसाय कौतुकास पात्र तर आहेच; पण त्याशिवाय शिक्षित बेरोजगार तरुणांसमोर त्याने एक नवा आदर्श घालून दिला आहे. 

अमोलची आई दीपाली मेस्त्री काबाड कष्ट करून कुटुंबाचा गाढ़ा झेपेल तसा ओढ़ण्याचा प्रयत्न करते. घरची परिस्थिती अत्यंत बेताचीच.घरात अठरा विश्‍व दारिद्रय, दोन मुले पदरात मात्र ती सुद्धा मतिमंद, अशातच पतीने साथ सोडल्याने कंबरडे मोडलेल्या संसाराला सावरायचे तरी कसे? हा यक्ष प्रश्‍न दीपाली मेस्त्री यांच्या समोर होता. मुलांना धड चालता बोलताही येत नसताना पती अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने दीपाली मेस्त्री या पुरत्याच कोलमोडून गेल्या होत्या. त्यातच दोन्ही मुले दिव्यांग असल्याने त्यांच्याकडे पहावे, की काबाडकष्ट करुन पोट भरावे या दुहेरी विवंचनेत असणाऱ्या दीपाली यांनी संसाराच्या गाड्याचा समतोल राखण्याची धडपड सुरू ठेवली.

एका बाजूने घराच्या छप्पराला दारिद्रयाची ठिगळे पडल्याने आदिच ढासळत असलेल्या मातीच्या भिंती दरवर्षी पावसात ढासळुन कमी होत होत्या; पण आर्थिक कुचंबणा डोके वर काढु देत नसल्याने या भिंती पुन्हा उभारण्याची ताकद झाली नाही; पण हतबल परिस्थिती आणि नियतीने ओढविलेल्या कर्मापुढे करणार तरी काय? दीपाली या शिवणकाम आणि मोलमजूरी करून कुटुंबाची रोजी रोटी कशी तरी भागवतात. या बिकट परिस्थितिचे चटके मुलेही खात होती.

यातच जिल्हा परिषद शाळा ओटवणे नं 1 मध्ये सहावित शिकणारा अमोल याने आईची होणारी फरपड लक्षात घेवून तिच्याच मार्गदर्शनाखाली अगरबत्ती बनून विकण्याचा व्यवसाय सुरु केला. यासाठी तिने सावंतवाडी येथील दिव्यांग संस्थेची मदत ही घेतली. मुळात थोडासा मतिमंद असलेला अमोल हा व्यवसाय यशस्वी करेल की नाही याबाबत शंका होती; पण गरिबीचे चटके सहन केलेल्या अमोल याने या व्यवसायात मन गुंतवून काही पैसे घरात आणण्याची केविलवाणी धडपड सुरू ठेवली. 

सध्या शाळा जरी बंद असल्या तरी शाळेबाहेरील शाळा या उपक्रमांर्तगत अमोल शिक्षणाचे धडे गिरवत आहे. सायंकाळी अभ्यास आटोपल्यानंतर अगरबत्ती बनविणे आणि त्या पॅकिंग करून सकाळी गावातच घरोघरी जावून विकणे हा नित्याचा क्रम अमोल याने धरला आहे. 

आईच्या चेहऱ्यावर समाधान 
या छोटेखानी व्यवसायाने अमोल आईला आर्थिक आधार देत आहे. तुटपुंजे का होईना पैसे घरात येत असल्याने काही अडचणी तरी कमी होत असल्याचा आनंद आईच्या चेहऱ्यावर पहायला मिळतो. या व्यवसायात पैसे किती मिळतात यापेक्षा आपला मुलगा दिव्यांग आहे, ही नकारात्मकता बाजूला करून मुलामध्ये बळकटी, उत्साह निर्माण करणारी आई आणि त्या उत्साहाचे फलित करणारा अमोल सारखा मुलगा सर्वांसाठीच प्रेरणादायी, आदर्शवत ठरत आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: story handicapped youth otawane konkan sindhudurg