esakal | मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी रणनीती
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी रणनीती

मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी रणनीती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण: मुंबई महानगर पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणेंसारखा सक्षम नेता भाजपला शिवसेनेच्या विरोधात मिळाला आहे. राणेंची केंद्रीय मंत्रिपदी लागलेली वर्णी हा भाजपच्या रणनीतीचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. यात भाजपला किती यश मिळेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल; मात्र महापालिका निवडणुकीत संपूर्ण राजकारण राणेंच्या भोवती फिरणार हे आताच्या घडामोडीवरून दिसत आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मुंबई महापालिका म्हणजे मिनी विधानसभा समजली जाते. सर्वंच पक्षांनी आपापल्यापरीने महापालिकेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक नेमकी कशी होणार, याकडे सर्वाचं लक्ष आहे. राज्यातील सध्याचे दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष मुंबई महापालिका जिंकण्यासाठी अटीतटीची लढाई लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद देऊन बळ दिले आहे.

महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपने कोअर कमिटी तयार केली आहे. त्यात नारायण राणेंचे पुत्र आमदार नीतेश राणेंचा समावेश केला आहे. माजी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात संपूर्ण राणे कुटुंब अधिक आक्रमक झालेले दिसेल.

आतापर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी होत आली आहे. २०१७ ची निवडणूक त्यास अपवाद ठरली होती. राज्यात सत्तेत असतानाही शिवसेना व भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. त्या वेळी भाजपने शिवसेनेला अटीतटीची लढत दिली होती. मात्र, निकालानंतर भाजपने नमते घेत शिवसेनेला महापालिकेत महापौर बसवण्याची संधी दिली. अर्थात, त्या वेळी राज्यातील सत्तेत काही गडबड होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला होता. आता मात्र भाजप निर्णायक लढाईसाठी सज्ज झाला आहे.

केंद्रात मंत्रिपद मिळालेले नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड या चार मंत्र्यांनी राज्यात जन आर्शीवाद यात्रा काढली. यात्रेदरम्यान राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांना अटक झाली. राणेंच्या अटक नाट्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा देशात गाजली. राज्यात शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले. कार्यालय फोडण्यापासून बॅंनर फाडण्यापर्यंतचे प्रकार घडले. राणेंना जामीन मिळाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यामुळे राजकीय घडामोडी वेगाने घडतील. त्यात राणे केंद्रस्थानी असतील. महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठीच भाजपने त्यांना बळ दिले आहे. आगामी काळात नारायण राणेंच्या भोवती फिरणाऱ्या राजकारणाची वेध घेणारी मालिका आजपासून.

- मुझफ्फर खान, चिपळूण

नारायण राणेंना मंत्रिपद देऊन भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी केली असेल, तर भाजपला यश मिळणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. उलट या वेळी शिवसेनेचे नगरसेवक सर्वाधिक निवडून येतील.

- भास्कर जाधव, आमदार शिवसेना

loading image
go to top