पुरग्रस्तांसाठी संपूर्ण सुधागड तालुक्यातून मदतीचा ओघ

अमित गवळे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

गेली कित्येक दिवस पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात महापुराने थैमान घातले आहे.  तेथील लोकांच्या जीवनावश्यक व वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारची मदत व वस्तू पुरविण्यासाठी सुधागड तालुक्यातील शिवऋण प्रतिष्ठाणने मदतीचे आवाहन केले आहे

पाली : गेली कित्येक दिवस पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात महापुराने थैमान घातले आहे. येथील लोकांच्या जीवनावश्यक व वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारची मदत व वस्तू पुरविण्यासाठी सुधागड तालुक्यातील शिवऋण प्रतिष्ठाणने मदतीचे आवाहन केले आहे. त्यास तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त बांधवांना मदतीसाठी पुढे या अशी साद समस्त सुधागड वासीयांना शिवऋण प्रतिष्ठानने घातली आहे. शिवऋण प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य पालीसह तालुक्यातील विविध गावांत मदतीसाठी फिरत आहेत. शनिवारी (ता. 10) पालीतील उंबरवाडी व बलाप गावातून शंभरहून अधिक साड्या, चांगले कपडे तसेच तांदूळ व डाळी, इतर जीवनावश्यक वस्तू आणि जनावरांसाठी खाद्य गावकऱ्यांनी दिले. रविवारी (ता.11) पाली, चिवे आणि रसाळ गावातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ आला. गुरुवारी (ता.15) दुपारपर्यंत संपूर्ण सुधागड तालुक्यातून व इतर ठिकाणांहून विविध प्रकारच्या वस्तू, अन्नधान्य, औषधे, जनावरांसाठी खाद्य गोळा केले जाणार आहे. आणि संध्याकाळी पाली मधून गोळा झालेली मदत सांगली, सातारा व कोल्हापूर कडे रवाना होईल.

मदतीसाठी संपर्क
किशोर खरीवले 8149883456, सचिन डोबले 8097770007, केतन म्हसके 9226959523,अमोल मोरे 9130602170, गंगाधर पांडव 8793300309, मयूर देशमुख 9168319379. हे सर्व सदस्य पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवाचे रान करत आहेत.

मदतीची गरज
 या पुरग्रस्तांना आता खरी गरज आहे ती जीवनावश्यक वस्तू  या ठिकाणी पोहचण्याची. कारण पूराचे पाणी ओसरल्यावर त्यांच्याकडे आता काहीही नसणार आहे. अगदी पिण्याच्या पाण्याची सुद्धा बाहेरून मदत करावी लागणार आहे.  तसेच रोगराई देखिल प्रचंड प्रमाणात पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे मेडीकल किट ची देखील गरज भासणार आहे. गाई गुरे देखील उपाशी आहेत त्यांच्याही चाऱ्याचा प्रश्न आहे. 

आपण काय काय मदत करू शकतो
जीवनावश्यक वस्तू, धान्य, साखर, तांदूळ, गरम कपडे, पुरुष-महिला-लहान मुलांचे कपडे, गहू. चहा पावडर,चटणी, मीठ, डाळी,साबण, टूथपेस्ट, टॉवेल सफाईसाठी आवश्यक साहित्य, मेडिकल किट, गुरे-म्हशी,बकऱ्या यांना तसेच इतर जनावरांचे खाद्य.

''आम्ही पूरग्रस्त भागातील आमच्या मित्रांच्या संपर्कात आहोत. कोणती मदत कोणत्या ठिकाणी लागणार आहे ते त्यांना माहीत आहे. तशा प्रकारची मदत जमा करण्याचे काम शिवॠण च्या माध्यमातून सूरू आहे. माणूस या एकाच नात्याने जोडलेले कित्येक जीव मदतीची वाट पाहत आहेत. त्यांच्या मदतीला धावून जाऊ. अख्या महाराष्ट्रातून मदतीचा ओघ जातोय, पण तो कमी पडणार आहे त्यामुळे हा आमचा खारीचा वाटा.''
- अमोल मोरे, अध्यक्ष, शिवऋण प्रतिष्ठान

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A stream of help from the entire Sudhagad taluka for the afflicted