महाराष्ट्रात शनिवारी कडकडीत बंद 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

सरकारने 10 ऑक्‍टोबरनंतरही याबाबत ठोस भूमिका न घेतल्यास गनिमी काव्याने हे आंदोलन केले जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आर्थिक दुर्बल घटकाला या केंद्राने लागू केलेले आरक्षण द्या

लांजा ( रत्नागिरी ) - मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्‍न असोत किंवा आरक्षण असो, हे सारे 9 ऑक्‍टोबरपर्यंत सोडवावेत, अशी आमची मागणी आहे. ती पूर्ण न केल्यास 10 ऑक्‍टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात कडकडीत बंद पाळला जाईल, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी लांजा येथील पत्रकार परिषदेत दिली. 

सरकारने 10 ऑक्‍टोबरनंतरही याबाबत ठोस भूमिका न घेतल्यास गनिमी काव्याने हे आंदोलन केले जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आर्थिक दुर्बल घटकाला या केंद्राने लागू केलेले आरक्षण द्या आणि पोलिस भरतीला तत्काळ स्थगिती द्या, या दोन प्रमुख मागण्यांसाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले. 

मराठा समाजाच्या हिताच्या 16 मागण्यांचे ठराव पारीत करण्यात आले; मात्र या मागण्यांबाबत शासन निर्णय घेण्यात चालढकल करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठा आरक्षण संघर्ष समिती व समन्वय समितीने 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याबाबत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मराठा बांधवांची भेट घेण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आलेले मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, समन्वय समिती अध्यक्ष विजयसिंहराजे महाडिक, मराठा विकास संघटनेचे भरत पाटील, समन्वयक दिग्विजय मोहिते यांनी लांजा येथे पत्रकार परिषद घेतली. 

आरक्षण व इतर मागण्यांसाठी 10 ऑक्‍टोबरला बंदची हाक देण्यात आली आहे. समाजबांधवांनी झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्र बंद यशस्वी करावा. हा बंद शांततेत पार पाडावा, असे आवाहन आम्ही मराठा समाजबांधवांना केले आहे; मात्र तरीही काही ठिकाणी आमचे बांधव कडक भूमिका घेतील. त्यातून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य शासनाची राहील. 
- सुरेश पाटील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strictly Closed Maharashtra on Saturday For Maratha Reservation