अध्ययन अक्षम विद्यार्थी योजनेसाठी रत्नागिरीतील १४४ जण निश्चित

राजेश शेळके
रविवार, 5 ऑगस्ट 2018

विद्यार्थ्यांसाठी ‘अध्ययन अक्षमता विद्यार्थी’ ही योजना राज्यात प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अशा विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा अन्य कोणत्या विषयात कल आहे; याचा समितीमार्फत अभ्यास सुरू आहे.

रत्नागिरी - अभिनेता आमीर खानच्या ‘तारे जमीं पर’ चित्रपटात डिसलेक्‍सियाग्रस्त विद्यार्थ्यांची कथा आहे. या चित्रपटातील ‘ईशान’ शालेय शिक्षणात गोंधळलेला दाखवला आहे. या चित्रपटाची प्रेरणा घेऊन अशा विद्यार्थ्यांसाठी ‘अध्ययन अक्षमता विद्यार्थी’ ही योजना राज्यात प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अशा विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा अन्य कोणत्या विषयात कल आहे; याचा समितीमार्फत अभ्यास सुरू आहे. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आहे. त्यामुळे त्यांना दहावी बोर्डाची परीक्षा देणे शक्‍य होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४४ विद्यार्थी निश्‍चित करण्यात आले.

विद्यार्थी दशेमध्ये अनेकांना काही विषयांमध्ये बिलकुल रस नसतो. काही विषय खूप आवडतात. परिणामी हे विद्यार्थी आवडत्या विषयातही मागे पडतात. 

‘तारे जमीं पर’ या चित्रपटात इंग्रजी स्पेलिंगच्या गोंधळामुळे ईशान निराश होतो, शाळेबाबत त्याची गोडी कमी होते. या समस्येची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आणि काही सूचना केल्या. त्याप्रमाणे सरकार ‘अध्ययन अक्षम विद्यार्थी’ योजना अमलात आणत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील अशा विद्यार्थ्यांची निवड करून विद्यार्थ्यांना आवडणारे विषय देण्यात येणार आहेत. 

योजनेअंतर्गत वर्षभर सर्व्हे सुरू होता. त्यामध्ये १४४ विद्यार्थी निश्‍चित झाले असून पंधरा ते वीस मुलांची लवकरच आवडत्या विषयासाठी चाचणी होणार आहे. 
- राजेंद्र कशेळकर,
अपंग पुनर्वसन तज्ज्ञ

आठ तज्ज्ञांची समिती
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ तज्ज्ञांच्या समितीपुढे या विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे. कल निश्‍चित करून तेच विषय त्यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे न आवडणाऱ्या विषयांमुळे आता कोणत्याच विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाणार नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Study Inability Students Scheme for Ratnagiri District