esakal | Ratnagiri : तडजोडीने ३० प्रकरणे मिटवण्यात यश
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

तडजोडीने ३० प्रकरणे मिटवण्यात यश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साडवली : तालुका विधी सेवा समिती, देवरूख यांच्यावतीने २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे दिवाणी न्यायालय देवरूख येथे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ११० प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती. त्यांपैकी तीस प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली आहेत.

या लोकअदालतीचे वैशिष्ट्य असे की, दिवाणीकडील ज्येष्ठ नागरिकांमध्ये असलेला हद्दीवरील वाद दावा सामंजस्याने व तडजोडीने एकमेकांशी संवाद साधून मिटवण्यात आला. हे प्रकरण तडजोडीने मिटवण्याकरिता दोन्ही पक्षकारांनी स्वतःहून तसेच त्यांच्या वकिलांनी पुढाकार घेऊन कायद्यातील योग्य तरतुदींचा अवलंब करून त्याचा स्वीकार केला. त्यासाठी त्यांच्या विधिज्ञांनी दोन्ही पक्षकारांना होणारे फायदे पटवून दिले तसेच पॅनलवरील पॅनल प्रमुख व पॅनल सदस्य यांनी यासाठी कायदेशीर मध्यस्थी करून लोकअदालतीमध्ये या प्रकरणी दावे तडजोडीने मिटवले.

हे दावा प्रकरण मिटल्याने दोन्ही पक्षकारांचा आनंद द्विगुणित झाला. जुना वाद विसरून त्यांनी या दिवशी एकमेकांना पेढे भरून आपापसातील वाद सामंजस्याने मिटवले. यापुढे होणाऱ्या लोकअदालतीमध्ये संबंधित पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतीमध्ये तडजोडीने निकाली करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देवरूख न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. पाटील यांनी केले आहे.

यांनी घेतली मेहनत

हे लोकअदालत यशस्वी करण्यासाठी देवरूख न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. पाटील तसेच पॅनल सदस्य वकील एम. एम. शहाणे, वकील सोनाली हातखंबकर, वकील भक्ती मुरुडकर, सामाजिक कार्यकर्त्या नेहा जोशी व न्यायालय सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

हेही वाचा: 'मुख्यमंत्र्यांच्या अहंकारामुळे रिफायनरीला ग्रहण'

पती-पत्नी नांदण्यासाठी गेले परत

फौजदारीकडील कौटुंबिक वाद प्रकरणातील दोन प्रकरणे सामंजस्याने मिटल्याने एका प्रकरणात पती-पत्नी सुखाने एकत्र नांदण्यासाठी परत गेली व दुसऱ्या प्रकरणात सासू-सुनेचा आपल्यातील जुना वाद लोक अदालतीमध्ये तडजोड करून संपुष्टात आणला.

सर्व करांची वसुली

याशिवाय ग्रामपंचायत, नगरपंचायत, बँक, एमएसईबी यांच्याकडील वादपूर्व प्रकरणांमध्येदेखील सर्व करांची वसुली मोठ्या प्रमाणात झाली. लोकअदालतीमध्ये तडजोड केल्यामुळे प्रकरणे कशा प्रकारे मिटतात, याचा एक चांगला संदेश जात आहे, हे यातून दिसून येते.

दृष्टिक्षेपात

  1. लोकअदालतीमध्ये एकूण प्रकरणे ११०

  2. तडजोडीने प्रकरणे मिटवली ३०

  3. कौटुंबिक वाद प्रकरणे २

loading image
go to top