रेंजसाठी ५ कि.मी. पायपीट करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कोकणची कन्या झाली पहिली डॉक्‍टर

success story Deepti Dashrath Vishwasrao Inaccessible zarye kokan dapoli
success story Deepti Dashrath Vishwasrao Inaccessible zarye kokan dapoli

लांजा (रत्नागिरी) :  प्रतिकूल परिस्थितीत स्वतः अभ्यास करून मोबाईल नेटसाठी ५ किमी अंतरावर दररोज पायपीट करून झर्ये या अति दुर्गम गावातील कोंडगे श्री रामेश्वर विद्यालयाची माजी विद्यार्थिनी दीप्ती दशरथ विश्वासराव (झर्ये) हिने नीट (मेडिकल) परीक्षेत विशेष यश संपादन केले. एमबीबीएससाठी अकोला येथील शासकीय महाविद्यालयात तीने प्रवेश घेतला. दीप्ती हिचे निर्भेळ यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. कोणतेही महागडे खासगी क्‍लास न घेता केवळ मोबाइल नेटवर्किंगवर जिद्द, मेहनत यावर नीटचे शिवधनुष्य पेलले. झर्ये या ग्रामीण भागातील मुलगी प्रथमच डॉक्‍टर होणार आहे. तिने आपल्या आई-वडिलांच्या कष्टांचे चीज करीत त्यांना देदीप्यमान यशाची भेट दिली. 

लांजा तालुक्‍यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी झर्ये गाव राजापूर तालुक्‍यात मोडते. अजूनही या गावात मोबाइल नेटवर्क नाही. मूलभूत सुविधांपासून हे गाव वंचित आहे. 
दीप्तीची नवोदय विद्यालय राजापूर येथे निवड झाली. त्या ठिकाणी दहावीत ९५ टक्के गुण मिळवून प्रथम आली होती. बारावीला पुन्हा सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले होते. नीट परीक्षेसाठी पूर्वतयारी नसताना तिला पहिल्या प्रयत्नात ३५० गुण मिळाले; मात्र निराश न होता पुन्हा नीटची तयारी करण्यासाठी सज्ज झाली. 

लांजात नातेवाईकांकडे नेट मिळावे, म्हणून राहिली
झर्ये गावात मोबाइल नेट नसल्याने ती सकाळी ५ किमी चालत येऊन ज्या ठिकाणी रेंज मिळेल, त्या ठिकाणी ऑनलाइन अभ्यास करत होती. लॉकडाउन झाल्याने ती लांजात नातेवाईकांकडे नेट मिळावे, म्हणून राहिली. नीटमध्ये दुसऱ्या प्रयत्नात ५७५/७५० गुण मिळवून यश संपादन केले. या गुणांमुळे तिला अकोला येथील शासकीय कॉलेजला प्रवेश मिळाला आहे.

आपल्यामध्येही टॅलेंट असते, नियमित सराव, अभ्यास केला पाहिजे. एनसीईआरटी पुस्तके यांचा अभ्यास केला पाहिजे. जीवनात संकटांना सामोरे जात आपण आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यासाठी संयम आणि प्रार्थनेचीही आवश्‍यकता असते. 
-दीप्ती विश्वासराव

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com