हर्णे - पाळंदे, पाजपंढरी, मुरुड, सालदूर आदी पंचक्रोशी मधील गावात कडकडीत बंद...

राधेश लिंगायत
रविवार, 22 मार्च 2020

दापोली तालुक्यातील एकमेव मासेमारी साठी प्रसिद्ध समजलं जाणार हर्णे बंदर काल पासूनच पूर्णपणे कडकडीत बंद झाले आहे. काल दिवसभर मच्छीमार कमिटी तर्फे रिक्षा फिरवून आवाहन करण्यात आले.

हर्णे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला हर्णे- पाळंदे, पाजपंढरी, मुरुड, सालदूर आदी पंचक्रोशी मधील गावात कडकडीत बंद असून जनता कर्फ्यु मध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले. 

दापोली तालुक्यातील एकमेव मासेमारी साठी प्रसिद्ध समजलं जाणार हर्णे बंदर काल पासूनच पूर्णपणे कडकडीत बंद झाले आहे. काल दिवसभर मच्छीमार कमिटी तर्फे रिक्षा फिरवून आवाहन करण्यात आले. बंदरामध्ये काम करणाऱ्या सर्व नागरिक, व्यवसायिक व मच्छीमार बांधवांना आव्हान करण्यात येते की, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता ३१ मार्चपर्यंत बंदर व बंदरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. बंदरामध्ये लिलाव होणार नसल्यामुळे जो कोणी मच्छीमार मासळी मारून येईल त्याने मच्छीच्या सेंटरला मासळी नेऊन व्यवहार करावा व २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कोणीही घराच्या बाहेर पडायचे नाही अशाप्रकारचा पूर्णपणे कडकडीत बंद पाळायचा आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यामुळे आज सकाळपासून नेहमीच गजबजलेल्या बंदरावर एकदम स्मशान शांतता होती. बंदराकडे येणाऱ्या रस्त्यावर व हर्णे जेटीवर देखील चिटपाखरूही फिरत नसल्याचे  चित्र दिसून आले. एरव्ही पर्यटकांनी गजबजलेली हर्णे बाजारपेठ व बंदर आज मात्र शांत होती. स्थानिकांनीदेखील घरातच बसून बंद पाळला होता. हर्णे एस.टी. स्टँडचा परिसर, मल्लखांबपेठची बाजारपेठ याठिकाणी प्रचंड शुकशुकाट हता.

तसेच एरवी पर्यटकांनी नेहमीच गजबजलेले मुरुड गाव व बीच आज मात्र प्रचंड शांत झाले होते. एरवी अन्य कारणांनी पुकारलेल्या बंदच्या काळात पंचक्रोशीतील गावांचा १००% सहभाग असतोच अस नाही. मात्र, आजच्या जनता कर्फ्युमध्ये या सर्वच गावांमध्ये पूर्णपणे कडकडीत बंद पाळून आपली उद्योगाची सर्व चक्रे थांबवली आहेत. 

हर्णे पोलीस दुरक्षेत्राचे बिट अंमलदार श्री. मोहन कांबळे, त्यांचे सहकारी श्री.मोहिते, तसेच महसूल विभागाचे कर्मचारी, दापोलीचे मंडल अधिकारी श्री.सुदर्शन खानविलकर यांनी संपूर्ण केळशीपर्यंतच्या विभागामध्ये काल (ता.२१) गस्त घातली . यावेळी बहुतांशी बाजारपेठ बंद झाली होती. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अकारण आढळून येणाऱ्यांना गाडी थांबवून घरी जाण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. व उद्या (ता.२२) सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडायचे नाही असे बजावून संगितले जात होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successfully of Janata Curfew harne kokan