सावंतवाडी पालिका कर्मचाऱ्यांची अचानक लेखणी बंद

रुपेश हिराप
Thursday, 1 October 2020

जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असे सांगत पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेतील महिला लिपिकाला कार्यालयीन निरीक्षकासमोर एका सत्ताधारी नगरसेवकाने स्टॉल प्रकरणात तातडीने कारवाई न केल्याबद्दल अवाच्य शब्दात बोलून मानसिक त्रास दिला. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अचानक लेखणी बंद पुकारले. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असे सांगत पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. याबाबतचे निवेदनही त्यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष संजू परब यांना दिले. 

नगराध्यक्ष परब तसेच मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पालिकेच्या महिला लिपिकेला केबिनमध्ये बोलावून कार्यालय निरीक्षकांसमोर एका स्टॉल प्रकरणात तातडीने कारवाई का केली नाही? अशी विचारणा करताना अर्वाच्य शब्दांमध्ये बोलून अपमानास्पद वागणूक दिली. यापूर्वीही तारतंत्री कर्मचाऱ्यांना व महिला अधिकाऱ्याला चूक नसताना नगरसेवकांकडून उद्धटपणाची वागणूक मिळालेली होती. त्यावेळी नगराध्यक्ष परब यांनी पुढाकार घेत यापुढे कोणत्याही नगरसेवकाचा कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही, असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे कोणत्याही आंदोलनाचा निर्णय पालिका कर्मचाऱ्यांनी घेतला नव्हता.

हे प्रकरण त्यावेळी मिटले होते; मात्र आज घडलेल्या घटनेनंतर संबंधित महिला लिपिकेचा रक्तदाब वाढल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी अचानक लेखणीबंद आंदोलन हाती घेतले. आज घडलेल्या विषयाप्रमाणे अनेक विषयात कर्मचारी टार्गेट होत आहेत. त्यामुळे लेखी ठोस आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असे सांगितले.

दरम्यान, याबाबत नगराध्यक्ष परब यांना विचारले असता ते म्हणाले, ""नगरसेवक व कर्मचारी यांच्यात चर्चा करून या प्रश्‍नही समन्वय घडवून आणणार आहे.'' यावेळी पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देवीदास आडारकर, उपाध्यक्ष परवीन, सचिव टी. पी. जाधव, सदस्य विजय बांदेकर, शिवप्रसाद कुडपकर, सुनील कुडतरकर, दीपक म्हापसेकर, डुर्मिग अल्मेडा, प्रशांत टोपले, प्रदीप सावरवाडकर, विठ्ठल मालंडकर, विनोद सावंत, आसावरी केळबाईकर, मनोज शिरोडकर, गीता जाधव, संजय पोईपकर, रसिका नाडकर्णी, गोपाळ सावंत आदी उपस्थित होते. 

झालेला प्रकार दुर्दैवी 
सत्ताधारी नगरसेवकाने एका महिला कर्मचाऱ्यासोबत केलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. कर्मचाऱ्यांना बोलण्याचा अधिकार हा नगरसेवकांना नाही. त्यांच्या काही चुका असतील तर त्या चुका मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना दाखविणे आवश्‍यक आहे; मात्र अर्वाच्य भाषेत बोलून मानसिक त्रास देणे, हे चुकीचे असून या अगोदर असा प्रकार कधी घडला नव्हता. आजचा प्रकार दुर्दैवी आहे, असे शिवसेनेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी सांगितले.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudden agitation of Sawantwadi Municipal Corporation employees