ऊस तोडणीचे सिंधुदुर्गात पहिले यंत्र दाखल

ऊस तोडणीचे सिंधुदुर्गात पहिले यंत्र दाखल

वैभववाडी - ऊस तोडणी कामगारांच्या कमतरतेमुळे संकटात सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अत्याधुनिक ऊस तोडणी यंत्रामुळे दिलासा मिळणार आहे. प्रतिदिन 100 टन ऊस तोडणी करणारे जिल्ह्यातील पहिले यंत्र पियाळी येथील संतोष कानडे यांनी सव्वा कोटी रूपये खर्चुन खरेदी केले आहे.

पंधरा ते वीस दिवसात 1600 टन ऊस तोडण्याची किमया त्या यंत्राने केली आहे. राजकारणात यश मिळाल्यानतंर बहुतांशी लोक सरळ सोप्या वाटणाऱ्या ठेकेदारीकडे वळतात हा अनुभव आहे; परंतु श्री. कानडे यांनी त्याला छेद देत धाडसी मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न केला आहे.

वैभववाडी, कणकवली हे दोन तालुके कार्यक्षेत्र असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील साखरकारखान्याची उभारणी असळज (ता. गगनबावडा) येथे झाल्यानंतर जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले. जिल्ह्यातील ऊस क्षेत्राने लाख टनाचा टप्पा पार केला आहे. दिवसेंदिवस हे क्षेत्र वाढत आहे; परंतु गेल्या दोन तीन वर्षापासुन ऊस तोडणी मजुरांच्या कमतरतेमुळे ऊस उत्पादक शेतकरी संकटात आल्याचे चित्र दिसुन आले. ऊस तोडणीमुळे शेतकऱ्यांनी आंदोलने देखील छेडली. त्यामुळे ऊस वेळेत तोडला जात नसल्यामुळे येथील शेतकरी ऊस शेतीपासुन फारकत घेण्याच्या विचारात होता. त्या शेतकऱ्यांसाठी ऊस तोडणी यंत्रामुळे फार मोठा दिलासा मिळणार आहे.

पियाळी येथील संतोष कानडे यांनी ऊस तोडणी यंत्र आणि त्यासोबत आवश्‍यक असलेले दोन लोडर ट्रक्‍टर विजयादशमीच्या मुहुर्तावर खरेदी केले. या सर्व यंत्र साम्रगीची सध्याची किमंत सव्वा कोटी रूपये आहे. या ऊस तोडणी यंत्राने आतापर्यत पंधरा ते वीस दिवसांत 1600 टन ऊस तोडला आहे. दिवसाला सरासरी 100 ऊस तोडणीची क्षमता या यंत्रामध्ये आहे. 100 मंजुराचे काम हे यंत्र करते. याशिवाय ऊस तोडणी मुळातुन होत असल्यामुळे त्याला फुटवा चांगला येणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महिन्याला हे यंत्र तीन हजार टन ऊसाची तोडणी करेल सलग पाच महिने या यंत्राने काम केल्यास 15 हजार टन ऊसाची तोडणी या तोडणी यंत्राच्या माध्यमातुन होणार आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांसाठी हे यंत्र लाभदायी ठरणार आहे.

""ऊस तोडणी यंत्रात आपण केलेली गुंतवणुक आणि त्या यंत्राला मिळणाऱ्या कामाचा कालावधी याचा ताळमेळ घातला तर तो व्यवहारीक दृष्ट्या फायदेशीर दिसत नव्हता; मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी वेळेत होवुन त्याची ससेहोलपट थांबावी या एकमेव या हेतुने आपण ऊस तोडणी यंत्र खरेदी केले आहे. हा आपला धाडसी निर्णय असला तरी तो शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण घेतला आहे. खासदार नारायण राणे यांचे मार्गदर्शन आणि जिल्हा बॅकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रोत्साहन यामुळेच हा निर्णय घेवु शकलो.''
- संतोष कानडे,
ऊस तोडणी यंत्र मालक

""मजुरांची कमतरता यापुढे शेतकऱ्यांना भासत राहणार आहे. त्यामुळे भविष्यात शेतीत यांत्रिकीकरणावर भर देणे आवश्‍यक आहे. मागील काही वर्षात ऊस तोडणीचा प्रश्‍न गंभीर बनला होता. त्यामुळे ऊस तोडणी यंत्र जिल्हयात असणे आवश्‍यक होते. परंतु जिल्हयातील शेतजमीनीचा विचार करून एखादे छोटे यंत्र तयार करणे आवश्‍यक आहे. या यंत्राचे खुप फायदे आहेत.''
- सतीश सावंत,
अध्यक्ष जिल्हा बॅंक सिंधुदुर्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com