आजारपणामुळे दिर छळायचा, `तिने` उचलले टोकाचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

तिच्यावर मुंबईत उपचार केल्यानंतर ती बरी झाली होती; मात्र डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत स्वरालीचा दिर इंद्रजित तिला आजारी असण्यावरून सारखा बोलायचा.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - वेताळबांबर्डे येथील नवविवाहिता स्वराली साईप्रसाद चव्हाण (वय 23) हिने सासरी होणाऱ्या दिराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. स्वरालीचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा दिर इंद्रजित तानाजी चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत स्वरालीचे वडील मनोहर मुणगेकर (रा.देवगड) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यात म्हटले आहे की, स्वरालीचा विवाह 23 डिसेंबर 2018 ला वेताळबांबर्डे येथील साईप्रसाद चव्हाण यांच्यासोबत झाला होता. साईप्रसाद गोवा येथे खासगी नोकरी करीत होता. स्वराली आजारी असल्याने साईप्रसाद गोवा येथील नोकरी सोडून कुडाळ शहरात नोकरी करीत आहे. 

वेताळबांबर्डे येथे स्वराली ही तिच्या पती, सासरे, सासू व दीर इंद्रजित चव्हाण यांच्यासह एकत्र राहायची. स्वराली आजारी असल्याने तिच्यावर मुंबईत उपचार केल्यानंतर ती बरी झाली होती; मात्र डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत स्वरालीचा दिर इंद्रजित तिला आजारी असण्यावरून सारखा बोलायचा. शिविगाळ करून मानसिक छळ करीत असे. स्वरालीने आम्हाला देवगड येथे आल्यानंतर याबाबतची माहिती दिली होती.

यासंदर्भात तिचा पती साईप्रसाद याला कल्पना दिली होती. त्यानंतर 9 मार्चला वेताळबांबर्डे येथील घरी असताना स्वरालीला तुला कामे करता येत नाही, असे इंद्रजित याने सांगत तिला शिविगाळ केली व कोयता मारण्याकरिता तिच्यामागे लागला होता. याची माहिती स्वरालीने दिल्यानंतर 11 मार्चला तिला देवगड येथे घेऊन जात असताना तिने आचरा येथे तिच्या आईसाठी एका प्लास्टीक बाटलीत उसाचा रस घेतला होता. 

देवगड येथील घरी आल्यानंतर दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास तिने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिला उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र 17 मार्चला तिचा मृत्यू झाला, अशी माहिती मुणगेकर यांनी तक्रारीत दिली आहे. याप्रकरणी स्वरालीला शिविगाळ व तिचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा दिर इंद्रजित चव्हाण याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide cases at vetalbambarde