तडीपारची व्याख्या जाहीर करावी - सुनील पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

कुडाळ - तडीपारची व्याख्या तरी पोलिस प्रशासनाने जाहीर करावी, असा संतप्त सवाल शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनिल पवार यांनी व्यक्त केला.

कुडाळ - तडीपारची व्याख्या तरी पोलिस प्रशासनाने जाहीर करावी, असा संतप्त सवाल शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनिल पवार यांनी व्यक्त केला.

निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षात येणाऱ्या वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ या भागातील 12 राजकीय कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस तसेच तडीपारीची नोटीस काही दिवसासाठी बजावली आहे. यामध्ये धीरज परब, संजू परब, जीवन बांदेकर यांचा समावेश आहे. हे तिघेही आतापर्यंत समाज कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. समाजाच्या प्रत्येक प्रश्‍नासाठी ते सातत्याने लढत आहेत. ते अन्यायाविरुद्ध लढत असताना अशा व्यक्तींना कायद्याने कारणे दाखवा नोटीस बजावणे किंवा तडीपार करणे हे संयुक्तीक आहे का ? या व्यक्तींचा खून, दरोडेखोर, लूटमार या प्रकारात कधीच सहभाग नाही. असे असताना त्यांची कोणतीही खातरजमा न करता पोलीस यंत्रणेने त्यांना बजावलेली नोटीस अयोग्य आहे. शिवाय रात्रीच्या वेळी फोन करून ताबडतोब पोलीस स्टेशनला या नाहीतर तात्काळ आम्ही तिथे येऊन तुमच्यावर नोटीस बजावू, असा कारवाईचा बडगा दाखवण्यात येतो.

या लोकशाही राज्यात अशा बडग्यामुळे त्या त्या कुटुंबांचे खच्चीकरण करणारे आहे. आपल्या राज्यात लोकशाही आहे, मोगलाई नाही. वेळप्रसंगी त्या पोलिसांच्या कारवाईबाबत संबंधितांनी आवाज उठवला पाहिजे. त्यांच्यासोबत आम्ही आहोत. त्यांच्यावर केलेली कारवाई अयोग्य आहेच शिवाय त्याचे खच्चीकरण करणारी आहे. पोलिसांनी कायदेशीर नोटीस कोणाला बजावता येते, तडीपार कोणाला करता येते, याची माहिती जनतेला देणे गरजेचे आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करताना धीरज परब, संजू परब, जीवन बांदेकर यांच्यावर करण्यात आलेली कारवाई निश्‍चितच अयोग्य आहे.''

रात्री बोलवले पोलिस ठाण्यात
धीरज यांनीही पोलिसांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ""रात्री साडेबारा वाजता पोलिस स्टेशनवरून फोन आला. कुठे आहात ? तुम्ही आहात तेथे आम्ही पोहचतो. तुम्हाला नोटीस बजावली आहे. ती आत्ताच घ्या, आम्हाला तसे आदेश आहेत. मी म्हणालो सकाळी पोलिस स्टेशनला येतो व घेतो. तर समोरून सांगण्यात आले की तुम्ही येत नसाल तर आम्ही घरी येतो. शेवटी रात्री 1 वाजता मी स्वतः पोलिस स्टेशनला जावुन नोटीस घेतली. सकाळी पोलीस उपविभागीय कार्यालयात दोन वेळा फोन लावला आणि विचारणा केली अशा नोटीसा फक्त विरोधी पक्षातील पदाधिकारी यांना दिल्या की इतर जणांना दिल्या. तर तेथुन कोणतीही माहिती मिळाली नाही.''

न्यायालयात जाणार
नोटीस बजावण्यात आलेल्यांना तडीपार केल्यास आपण समाज म्हणून धीरज परब, रुपेश राऊळ, संजू परब यांच्या बाजूने जिल्हा कोर्टात रिव्हिजन अर्ज दाखल करू, असे सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक ऍड सुहास सावंत यांनी सकाळशी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Pawar comment