३० वर्षे खासदारकी मिळूनही विकासाकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मार्च 2019

फक्त एकदाच निवडून द्या, विकास करण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील. ३० वर्षे खासदारकी केलेल्या लोकप्रतिनिधींनी या भागाच्या विकासाकडे पूर्ण दुर्लक्षच केल्याची टीका रायगड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली. हर्णै येथे प्रचार सभेत ते बोलत होते. 

हर्णै - लोकसभा निवडणूक ही लढाई निष्क्रियते विरुद्ध सक्रियतेची लढाई आहे. निष्क्रिय ३० वर्षाचा कारभार व विकासाभिमुख कार्यक्रम समोर ठेवून या भागामध्ये काम करण्याची आमची मानसिकता आम्हाला दाखवून द्यायची आहे. फक्त एकदाच निवडून द्या, विकास करण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील. ३० वर्षे खासदारकी केलेल्या लोकप्रतिनिधींनी या भागाच्या विकासाकडे पूर्ण दुर्लक्षच केल्याची टीका रायगड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली. हर्णै येथे प्रचार सभेत ते बोलत होते. 

मच्छीमार समाज हा प्रचंड कष्टकरी आहे. त्यांना उत्पन्नाचे साधन मिळण्यासाठी निव्वळ मदत म्हणून विकास करायचा नसून राष्ट्राला देखील भरघोस चलन मिळवून देणारा हा मत्स्य व्यवसाय आहे. तेव्हा या व्यवसायाच्या दृष्टीने त्या भागाचा विकास करणे, हे त्या लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे काम आहे. अलीकडे या भागामध्ये एलईडी मासेमारीचा ज्वलंत प्रश्न मच्छीमाराना भेडसावत आहे. या विषयामध्ये लोकप्रतिनिधींनी ठामपणे पाठीशी उभे राहणे गरजेचे असते. हर्णै बंदरातील जेटीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे.

अत्याधुनिक बंदर  झाले तर या भागाला प्रचंड फायदा होईल. सहावेळा खासदारकीची निवडणूक लढवून लोकांनी खासदार म्हणून निवडून देऊनही गितेंनी बंदराकडे दुर्लक्ष केले. मला फक्त एकदाच संधी द्या, केंद्र शासनाकडून निधी आणून अत्याधुनिक बंदर उभे करण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही तटकरे यांनी दिली.  श्रीवर्धनसारखी चौपाटी मुरूड-कर्दे किनारपट्टीवर निर्माण करणार आहोत. 

काम न करणाऱ्यांना बहिष्कृत करा
एलईडी मच्छीमारीविरोधात येथील मच्छीमारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत तटकरे म्हणाले, विद्यमान सरकार आल्यावरच एलईडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मच्छीमारांनी मतदानावर बहिष्कार टाकून न कळत त्यांना मदत करण्यापेक्षा काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ताकद व शक्ती उभी करा. तुमच्यासाठी भांडून केंद्र तसेच राज्य सरकारच्या नियमांमध्ये बदल करून पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडेन. ज्यांनी काम केलेले नाही, त्यांना बहिष्कृत करण्यासाठी मतदान करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Tatkare comment