esakal |  मुंबई-गोवा महामार्गावर होणार सुपर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल 
sakal

बोलून बातमी शोधा

Super Multi specialist Hospital to be set up on Mumbai Goa Highway

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली ते रत्नागिरी या दरम्यान वैद्यकीय सोयीसुविधांनी सुसज्ज असलेले हॉस्पिटल उपलब्ध नाही.

 मुंबई-गोवा महामार्गावर होणार सुपर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल 

sakal_logo
By
राजेंद्र बाईत

राजापूर - मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील ओणी येथील मागणी असलेल्या सुपर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेली सुमारे पंधरा एकर जागा उपलब्ध करून देण्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या मागणी आणि आमदार राजन साळवी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येताना ओणी येथे हॉस्पिटल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली ते रत्नागिरी या दरम्यान वैद्यकीय सोयीसुविधांनी सुसज्ज असलेले हॉस्पिटल उपलब्ध नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघात झाल्यास अपग्रातग्रस्तांना उपचारासाठी लांब पल्याच्या कोल्हापूर किंवा मुंबई येथे हलवाले लागते. त्यामध्ये अनेकांना वेळेत उपचाराअभावी प्राणही गमवावा लागला आहे. त्यातच, तालुक्यामध्ये स्थानिक पातळीवरही मोठे हॉस्पिटल नाही. शासकीय रूग्णालये आहेत. मात्र, अनेक ठिकाणी आवश्यक असलेल्या विविध सोयीसुविधांची कमतरता आहे. त्यामुळे महामार्गावरील ओणी येथे सुपर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल व्हावे अशी पंचक्रोशी ग्रामविकास समितीतर्फे गेल्या दोन-तीन वर्षापासून सातत्याने केली जात आहे. त्यासाठी आमदार साळवी यांनीही शासन दरबारी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ओणी येथे उपलब्ध आहे. मात्र, त्याच्या हस्तांतरणाचा प्रश्‍न प्रलंबित राहीलेला होता.


दरम्यान, त्यासंबंधित खासदार विनायक राऊत यांचा पुढाकार आणि आमदार साळवी यांच्या पाठपुराव्यासह प्रयत्नांनी काल (ता.16) मुंबई येथे बांधकाममंत्री श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. त्यामध्ये हॉस्पिटलसाठी ओणी-तिवंदामाळ येथी बांधकाम विभागाच्या उपलब्ध असलेल्या सुमारे पंचवीस एकरपैकी पंधरा एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार श्री. साळवी यांनी केली. त्यावर चर्चा होवून श्री. चव्हाण यांनी हॉस्पिटल उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्यास हिरवा कंदील दिला. त्यामुळे आता सुपर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल जागा हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

हे पण वाचा - कोकणातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा : निलेश राणे यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

लांजा तालुक्यातील पूर्व विभाग, कोल्हापूर परिसाराला जोडणारा भांबेड ते गावडी हा रस्ता करण्याची मागणी आमदार राजन साळवी यांनी यावेळी केली. हा रस्ता झाल्यास लांजा पूर्व भागातील लोकांना कोल्हापूर-मलकापूर या परिसरास व्यापार व उद्योग धंद्यासह बाजारपेठेसाठी जाणे सोयीचे ठरणार असल्याची बाबही श्री. साळवी यांनी निदर्शनास आणून दिली. त्यांच्या या मागणीची दखल घेवून बांधकाममंत्री अशोक चव्हाण या रस्त्याच्या सर्व्हेक्षण करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले. या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी यावेळी आश्‍वासित केले. 

संपादन - धनाजी सुर्वे