केंद्र शासनाने दिली परवानगी ; येथे होणार आता कोरोनावरील औषध तयार....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कोरोनावरील औषध निर्मितीत "सुप्रिया'चा सहभाग... कंपनी रेमडेसीवीर या औषधावरही काम करत असून हे औषध लवकरच बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहे

 

चिपळूण (रत्नागिरी)  : कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरलेल्या हायड्रोक्‍सीक्‍लोरोक्वीन गोळीसाठी लागणारा कच्चा माल तयार करण्याचा परवाना लोटे (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफसायन्स कंपनीला मिळाला आहे. केंद्र सरकारकडून असा परवाना मिळालेली ही राज्यातील एकमेव कंपनी आहे. कंपनीचे अध्यक्ष व डॉ. सतीश वाघ यांनी ही माहिती दिली. 

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शास्त्रज्ञ औषधे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाग्रस्तांना बरे करण्यामध्ये काही औषधे उपयुक्त ठरत आहेत. त्यापैकी सालबुटामॉल सल्फेट आणि सिट्राजिन हायड्रोक्‍लोराईड ही औषधे लोटेतील सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेड अनेक वर्षापासून तयार करीत आहे. या आजारावर हायड्रोक्‍सीक्‍लोरोक्वीन औषध उपयुक्त ठरत असल्याचे अनेक क्‍लिनिकल ट्रायल्सनंतर सिद्ध होत आहे. डॉ. वाघ यांच्या कंपनीतील पदाधिकाऱ्यांशी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेड या राज्यातील एकमेव कंपनीला हायड्रोक्‍सीक्‍लोरोक्वीन गोळ्यांसाठी लागणाऱ्या औषधीय कच्च्या मालाचे उत्पादन करण्यासाठी लागणारे टेस्ट लायसन्स नुकतेच प्राप्त झाले आहे

हेही वाचा- सावधान ; आंबोलीत जाताय  ; पोलिसांच्या या कारवाईला जावे लागणार सामोरे... -

डॉ. सतीश वाघ; कच्चा माल तयार करण्याचा परवाना, राज्यातील एकमेव कंपनी ​

कंपनी रेमडेसीवीर या औषधावरही काम करत असून हे औषध लवकरच बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीकडे हायड्रोक्‍सीक्‍लोरोक्वीन सल्फेट या औषधीय कच्चा मालाचे उत्पादन करण्यासाठी परवाना प्राप्त झाला असून कंपनी येत्या 1 ते 2 महिन्यात या औषधीय कच्च्या मालाचे उत्पादन नियमित करण्याच्या प्रयत्नात आहेत. कोरोना रुग्णांना वेळेत बरे होता यावे, तसेच औषधांचा तुटवडा होऊ नये, यासाठी कंपनीचे अधिकारी कामाला लागले आहेत. "सुप्रिया'ने आपल्या 34 वर्षांच्या प्रवासामध्ये जगातील 155 देशांमध्ये आपले वर्चस्व स्थापित केले आहे. 

हेही वाचा- भाजपचे शिष्टमंडळ धडकले थेट महावितरणवर ; महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिले असे आश्‍वासन.... -

विशेष कौतुक 
सुप्रिया लाइफ सायन्स कंपनीला केंद्र सरकारकडून कोरोनावरील या औषधासाठीचा कच्चा माल तयार करण्याची विशेष परवानगी प्राप्त झाली आहे. कोरोनावर औषध तयार करण्यासाठी जगभरातील कंपन्या व वैद्यकीय शास्त्रज्ञ प्रयत्न करत असताना त्या प्रयत्नांचा एक भाग होण्याची संधी जिल्ह्याला प्राप्त झाल्याबद्दल विशेष कौतुक होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya involvement in corona drug production in chiplun