कोकण रेल्वेचा बॅकलॉग भरून काढू- प्रभू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

कणकवली : कोकण रेल्वे कोकणला विसरली होती; पण कोकणचा हा बॅकलॉग आम्ही भरून काढणार आहोत. रेल्वे दुपदरीकरणासाठी साडेचार हजार कोटींची तरतूद केली आहे. लवकरच विद्युतीकरणाला प्रारंभ होईल. एवढेच नव्हे, तर पुढील काळात कोकण रेल्वे ही देशातील नावाजलेली संस्था होईल, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे केले.

कणकवली : कोकण रेल्वे कोकणला विसरली होती; पण कोकणचा हा बॅकलॉग आम्ही भरून काढणार आहोत. रेल्वे दुपदरीकरणासाठी साडेचार हजार कोटींची तरतूद केली आहे. लवकरच विद्युतीकरणाला प्रारंभ होईल. एवढेच नव्हे, तर पुढील काळात कोकण रेल्वे ही देशातील नावाजलेली संस्था होईल, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे केले.

कणकवली रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे उद्‌घाटन श्री. प्रभू यांनी येथे केले. त्याचबरोबर वेरवली (जि. रत्नागिरी) येथील स्थानकाचे उद्‌घाटनदेखील त्यांनी रिमोटद्वारे केले. या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, कणकवलीच्या प्रांताधिकारी नीता शिंदे, माजी आमदार ऍड. अजित गोगटे, राजन तेली, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, कणकवलीच्या नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. प्रभू म्हणाले, ""कोकण रेल्वे ही कोकणवासीयांनाच विसरली होती. आवश्‍यक सोई सुविधांसाठी परवानग्याच मिळत नव्हत्या. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण तर पेलवणार नव्हतं. मात्र दुपदरीकरणासाठी 4500 कोटींची तरतूद केलीय. रोह्यापासून दुपदरीकरणाचं कामदेखील सुरू झालंय. नव्या वर्षापासून विद्युतीकरण कामाला प्रारंभ होईल. एकूणच वेगवान प्रवासाबरोबरच प्रवाशांना आवश्‍यक त्या सर्व सोई सुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.''

पूर्वी रत्नागिरी स्थानकात जाण्यासाठी पायऱ्या चढताना दमछाक व्हायची. तेथे आम्ही सरकता जिना, लिफ्ट आदींची उभारणी केली. कणकवलीतही सरकता जिना आजपासून कार्यान्वित होतोय. नव्या 11 स्थानकांच्याही उभारणीला लवकरच प्रारंभ होईल. कोकण रेल्वेचा किनारपट्टीतील तालुक्‍यांनाही फायदा व्हायला हवा. यासाठी मालवण पोस्ट कार्यालयात तिकीट बुकिंग सुरू केलंय. देवगड, वेंगुर्लेतही तशी सुविधा सुरू करू. वेंगुर्लेतील एमटीडीसीचे रिसॉर्ट बंद पडलंय. ते पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न करतोय. वेंगुर्लेतील हॉस्पिटलचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही श्री. प्रभू यांनी दिली. आजच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, सतीश सावंत हे राजकारणासाठी नाही तर विकासासाठी आले आहेत. त्यांचे आणि आमचे जुने ऋणानुबंध आहेत, असेही श्री. प्रभू म्हणाले.

खासदार विनायक राऊत म्हणाले, ""रेल्वे मंत्रिपदाची धुरा श्री. प्रभू यांच्याकडे आल्यानंतर कोकणवासीयांचे अच्छे दिन सुरू झाले आहेत. मागील पंचवीस वर्षातील यातनादायी प्रवास आता सुखकर होतोय. कोकण रेल्वे आता खऱ्या अर्थाने कोकणवासीयांची झाली आहे.''
या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र शेट्ये, नगरसेविका राजश्री धुमाळे, शिवसेनेचे राजू शेट्ये, प्रथमेश सावंत आदी उपस्थित होते.

प्रभू यांची आश्‍वासने
* सर्व स्थानकांवर प्रमुख गाड्या थांबण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि कोकण रेल्वे अधिकाऱ्यांची समिती गठित होणार
* दर्जेदार सुविधा असलेली "हमसफर' गाडी लवकरच धावणार
.* कोकण रेल्वे मार्गावर चांगल्या दर्जाच्या गाड्या धावणार
* कणकवलीलगतच्या बोर्डवे स्थानकाची निर्मिती विचाराधीन
* कणकवली रेल्वे स्थानकाचे काम कमी वेळेत केल्याबद्दल रेल्वे कर्मचाऱ्यांना 50 हजारांचे पारितोषिक

स्थानकांसमोर उद्यानांची निर्मिती
कणकवली रेल्वे स्थानकासमोरील उद्यान कणकवली नगरपंचायत विकसित करणार आहे. त्याच धर्तीवर कुडाळ, सावंतवाडी व इतर सर्वच स्थानकांसमोर उद्यानाची निर्मिती व्हायला हवी. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सामाजिक संस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन श्री. प्रभू यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suresh prabhu assures to fill backlogue