esakal | स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली बलोपासनेची पायाभरणी
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली बलोपासनेची पायाभरणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी येथे राजकीय बंदिवासात असलेल्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी अस्पृश्यताविरोधी आंदोलनात १९२९ साली आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला. त्यांनी रत्नागिरीत बलोपासनेची पायाभरणी केली. या घटनेला ९२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याविषयी...

- अ‍ॅड. बाबा परुळेकर,

अध्यक्ष, पतितपावन मंदिर संस्था, रत्नागिरी

हिंदू समाजातील तरुणाईने एकत्रितपणे बलोपासना केली पाहिजे यासाठी सावरकरांनी प्रथमपासूनच प्रयत्न सुरू केले होते. नगर संस्थेने डॉ. शिंदे यांच्या प्रस्तावाप्रमाणे ठराव करून शहर व्यायामशाळेचे कार्य सुरूही केले होते. पहिल्या तीन वर्षांत ही व्यायामशाळा चालवण्याचा व टिकवण्याचा भार सावरकरांच्या हिंदू मंडळास वाहावा लागला. सावरकरांची प्रेरणा, प्रयत्न आणि डॉ. शिंदे, रा. सा. रानडे, जनुभाऊ लिमये, श्री. खातू प्रभृती म्युनिसिपल सभासदांनी जी मेहनत घेतली, त्याचे चीज १९२९ साली झाले आणि रत्नागिरी नगरपालिकेने चार हजार रुपये खर्चून जागा घेऊन त्यावर पक्के बलोपासना मंदिर उभारण्याचे ठरवले.

हेही वाचा: मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदाराला गडकरींचा झटका

सर्व प्रयत्नांमुळे व व्यायामशाळेच्या उभारणीमुळे रत्नागिरी येथील बऱ्याच युवकांना लहानपणातच व्यायामाची व शरीरसंवर्धनाची आवड निर्माण झाली. गाडीतळाजवळच्या भागात विस्तीर्ण मोकळी जागा होती. बॅरिस्टर सावरकरांनी या पटांगणाचे स्वातंत्र्यलक्ष्मी चौक असे स्फूर्तीदायी नामकरण केले. आजही याच नावाने हे पटांगण प्रसिद्ध आहे.

काही वर्षांनी विजयादशमीच्या दिवशी दरवर्षी नगरपालिकेच्या वतीने या पटांगणात शहर, जिल्ह्यातील व्यायामपटूंची व्यायामाची व धाडसी उपक्रमांची प्रात्यक्षिके सादर करून दसरा उत्सव साजरा होऊ लागला. या निमित्ताने मुले, युवकांना एकत्र येऊन व्यायामास प्रेरित करणार्‍या अशा उपक्रमांमुळे जातीभेदाच्या विषाणूचे निर्मूलन होण्याचे सावरकरांचे कार्यासही गती मिळाली. या उत्सवासाठी नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकात तरतूद असे. १९७५-८० च्या सुमारास अनाकलनीय कारणांकरिता या समारंभाच्या परंपरेमध्ये खंड पडला.

विजयादशमीच्या सोहळा आयोजनाचा अभाव

अलीकडेच या व्यायामशाळेच्या मूळ इमारतीचे जागी नवीन इमारत नगरपालिकेततर्फे बांधण्यात आली आहे. यामध्ये मुलांप्रमाणे मुलींनाही स्वतंत्रपणे व्यायाम शिकण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याखेरीज पालिकेची आणखी व्यायामशाळा, खासगी व्यक्तींच्या व्यायाम शिक्षण शाळाही रत्नागिरीत सुरू झाल्या आहेत. हे सर्व स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९२५ पासून घेतलेल्या कष्टांचे फळ आहे. पण या सर्वात खंत एकच आहे, ती म्हणजे नगरपालिकेच्या विजयादशमीच्या सोहळ्याच्या आयोजनाचा अभाव.

loading image
go to top