जलतरण तलाव खुला, जलतरणपटूंची पाठ । Ratnagiri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी : जलतरण तलावा खुला, जलतरणपटूंची पाठ

रत्नागिरी : जलतरण तलावा खुला, जलतरणपटूंची पाठ

रत्नागिरी : कोरोना काळात गेली दीड ते पावणेदोन वर्षे बंद असलेल्या जलतरण तलावाचा दरवाजा उघडला आहे; मात्र खास जलतरणपटूंना सरावासाठी खुला ठेवण्यात आला आहे. इतर सर्वसामान्यांसाठी अजून तसा विचार जिल्हा क्रीडा विभागाने केलेला नाही; मात्र चार दिवस होऊनही अजून एकाही खेळाडूने प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही. जलतरण तलावाची स्वच्छता आणि पाणी बदलून सर्व काही सज्जता केली आहे. परंतु आता जलतरण तलावाला खेळाडूंची प्रतीक्षा आहे.

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे साळवी स्टॉप येथील जलतरण तलाव बंद ठेवण्यात आला होता. यापूर्वी एका घटनेमुळे काही महिने तलाव बंद होता. त्यानंतर या तलावावर लाखो रुपये खर्च करून अद्ययावत करण्यात आला होता. जलतरणपटूंसाठी तलाव सुरू करण्यात यावा, अशी मागणी क्रीडा क्षेत्रातून होत होती. त्याची दखल शासनाने घेऊन राज्यातील सर्व जलतरण तलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला; मात्र रत्नागिरी शहरातील जलतरण तलाव बंद होता. मंत्री उदय सामंत यांनी याबाबत क्रीडा विभागाची बैठक घेतली आणि जलतरण तलाव सुरू करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या.

हेही वाचा: चिमूर : महिला वन कर्मचाऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यु

जिल्हा क्रीडा विभागाने मंत्र्यांच्या सूचनेवरून जलतरण तलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पूर्वीच्या ठेकेदाराला बोलावून घेऊन बंद तलावाची स्वच्छता आणि इतर काम करून घेतले. जलतरण तलावातील पाणीही बदलण्यात आले आहे. क्रीडा विभागाने जलतरणपटूंना सरावासाठी तलाव खुला केला आहे. खेळाडूंनी नावनोंदणी करावी, असे आवाहन ठेकेदार आणि क्रीडा विभागाने केले आहे. त्यासाठी कोरोनाचे दोन डोस पूर्ण असणे बंधनकारक केले आहे; मात्र चार दिवस झाले तरी एकाही जलतरणपटूने नोंदणी केलेली नाही.

शासनाच्या सूचनेनुसार जलतरण तलाव रविवारपासून सुरू केला आहे. सध्यातरी फक्त जलतरणपटूंसाठी तो खुला राहणार आहे. त्यासाठी जरतरणपटूंनी नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. काही संघटनांशी संपर्क साधला आहे; मात्र अजून एकाही खेळाडूने नोंदणी केलेली नाही.

- किरण बोरावडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी

loading image
go to top