अत्यंत अवघड व कठिण तैलबैला किल्ला साहसी गिर्यारोहकांनी केला सर | Tailbaila Fort | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tailbaila Fort
अत्यंत अवघड व कठिण तैलबैला किल्ला साहसी गिर्यारोहकांनी केला सर

अत्यंत अवघड व कठिण तैलबैला किल्ला साहसी गिर्यारोहकांनी केला सर

पाली - अत्यंत अवघड व कठिण श्रेणीत गणला जाणारा तैलबैला किल्ला " मॅकविला द जंगल यार्ड' च्या साहसी गिर्यारोहकांनी नुकताच यशस्वीपणे सर केला आहे. अशी माहीती सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांनी गुरुवारी (ता.25) सकाळला दिली.

या किल्ल्याची समुद्र सपाटीपासुन उंची तब्बल 3 हजार 332 फुट इतकी आहे. गिर्यारोकांनी 250 फूट प्रस्तर भिंतीवर प्रस्तरारोहण केले. हा किल्ला पुणे जिल्ह्यात येत असला तरी सुधागड तालुक्याच्या सीमेवर आणि सुधागड किल्ल्याच्या अगदी समोर आहे.

सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध गिर्यारोहक व प्रस्तरारोहक आणि " मॅकविला द जंगल यार्ड' चे संस्थापक मॅकमोहन हुले व रोहन वेदपाठक यांनी या मोहिमेचे आयोजन व नेतृत्व केले होते. गिर्यारोहणाची आवड असलेल्या मुंबई व सुधागड तालुक्यातील काही निवडक तरूणांनी गिर्यारोहणाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण घेऊन आपली आवड जोपासत आजवर अनेक सुळके व गड किल्ले सर केले आहेत.

या डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी गरजेचे सामान व गिर्यारोहणाच्या तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे. वर्धन विजयकर, किरण बेकावडे, अनिकेत पवार, शिल्पा तोरस्कर, गोविंद कुळे, तुषार पाटील, अंबादास वैशंपायन, अभिलाष पणीकर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.

हेही वाचा: कणकवलीत करातून जमा झालेला निधी खर्च करणे चुकीचे : कन्हैया पारकर

उंच, भारदस्त व कठीण तैलबैला

तैलबैला किल्याची समुद्र सपाटीपासुन उंची 3 हजार 332 फुट इतकी आहे. तैलबैला किल्याचा प्रकार हा गिरिदुर्ग असून, पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगर रांगेत हा किल्ला स्थित आहे. तसेच सुधागड तालुक्यातील धोंडसे गावाच्या सीमेवर आहे. सह्याद्रीची रचना आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हारसातून या डोंगरांची निर्मिती झालेली आहे. या लाव्हारसाचे थर थंड होताना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे डाईक तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर. तैलबैलाची भिंत साधारणपणे 3310 फुट उंच असून उत्तर-दक्षिण अशी पसरलेली आहे.

‘तैलबैला चा इतिहास

तैलबैलाचे पूर्वीचे नाव ‘बैलतळ’ असे होते. मात्र, हा किल्ला असल्याचा पुरावा अद्याप कुठेही सापडलेला नाही. इंटरनेटवर शोध घेतल्यास याचा उल्लेख किल्ला म्हणून दिसतो. मात्र, हा किल्ला नसून, केवळ टेहाळणी करण्याचे एक ठिकाण आहे. या डाईक भिंतीवर चढाई करताना एक सुंदर आणि विलक्षण थराराचा अनुभव घेता येतो.

प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठेपर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली आहे. तैलबैला हा जुन्या काळातील कोकणातून सवाष्णी घाटावरून येणाऱ्या पायवाटेवरील वॉच टॉवर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक अवघड मार्गाचा फायदा घेऊन वर लपून बसत. त्यामुळे ब्रिटिश सरकारने सुरुंग लावून मधील पायऱ्या उद्‌ध्वस्त केल्या आहेत.

कसे जाल?

तैलबैलाच्या पायथ्याशी असणार्‍या तैलबैला गावात जाण्यासाठी प्रथम लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भूशी डॅम, आय.एन.एस.शिवाजी मार्गे अ‍ॅम्बी व्हॅलीच्या दिशेने जावे. कोरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर गावापासून फाटा अंदाजे 8.5 किमी अंतरावर आहे. मुख्य रस्त्यावरून उजव्या बाजूला वळणार्‍या रस्त्यावर ‘तैलबैला’ असा फलक लावलेला आहे. या फाट्यापासून तैलबैला हे गाव साधारण 3 किमी अंतरावर आहे. येथून ट्रेकिंग करत चढाई करता येते. तसेच सुधागड तालुक्यातील धोंडसे गावातून देखील येथे पोहचता येते. मात्र त्यासाठी ट्रेक करून जावे लागते. असे मॅकमोहन हुले यांनी सकाळला सांगितले.

loading image
go to top