रत्नागिरीः तळेसह दयाळ परिसरात कंटेन्मेंट झोन जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

तळे-चंदनवाडी येथे एकाच कुटुंबातील चौघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव आल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. बुधवारपासून गावातील चंदनवाडी, कुदळवाडी परिसरात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून या ठिकाणी जाणारे मार्ग बंद आले आहेत.

खेड ( रत्नागिरी ) - तळे-चंदनवाडी येथे एकाच कुटुंबातील चौघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव आल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. बुधवारपासून गावातील चंदनवाडी, कुदळवाडी परिसरात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून या ठिकाणी जाणारे मार्ग बंद आले आहेत. यापाठोपाठ दयाळ-खेराडेवाडी, झुझमवाडी, तांबडेवाडी परिसरही सील करण्यात आला आहे. कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील दोघांसह अन्य पाच जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

तालुक्‍यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणांच्या चिंतेत भर पडली आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 22 वर जाऊन पोचली आहे. तळे- चंदनवाडी येथील रहिवासी व मुलुंड येथून गावी आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याने गावात खळबळ उडाली. कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध अजूनही सुरू आहे.

या दोन वाड्यांमध्ये जाण्यास ग्रामस्थांना अटकाव करण्यात आला आहे. दयाळ-खेराडेवाडी येथील 60 वर्षे वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांची काळजी वाढली आहे. गावातील तीन वाड्यांमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातील 26 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ज्या वाहनातून प्रवास केला, त्या वाहनांमध्ये अन्य 13 जण होते. त्यातील तिघेजण शेरवली व आयनी येथील रहिवासी आहेत. त्या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. कळंबणी जिल्हा रुग्णालयात 17 जण आयसोलेशनमध्ये देखरेखीखाली आहेत. लवेल व कंळबणी येथील संस्थात्मक कक्षात 69 जण निगराणीखाली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.  

वाघिवरे कदमवाडी प्रशासनाकडून सील 
चिपळूण तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. वाघिवरे येथे दोन दिवसांपूर्वी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर गुरुवारी (ता. 28) रात्री पुन्हा 2 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकाच कुटुंबातील 19 वर्षीय तरुणी व तिच्या वडिलांना (वय 49) कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे वाघिवरे कदमवाडी प्रशासनाकडून सील करण्यात आली.

तालुक्‍यात सुरवातीस खांदाटपाली, तळसर, कळंबस्ते येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर कापरे, कोसबी, कळबंट व वाघिवरे येथे रुग्ण आढळले तर चिपळूण शहरात गेले दोन महिने कोरोनाचा शिरकाव नव्हता. मात्र लोटे येथील परशुराम रुग्णालयात कार्यरत असलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याने शहरात खळबळ उडाली. तो कितीजणांच्या संपर्कात आला, याची शोधमोहीम प्रशासनाकडून सुरू आहे.

दरम्यान, वाघिवरे येथे दोन दिवसांपूर्वीच एकजण कोरोनाबाधित आढळला होता. त्यातच गुरुवारी रात्री आणखी दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. दोघेही दहिसर मुंबई येथून 15 मे रोजी वाघिवरे कदमवाडी येथे आले होते. 

दोघांनाही तालुका प्रशासन आणि ग्राम कृतिदलाकडून होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना काही दिवसांपूर्वी ताप, खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेत तपासणी केली होती. आरोग्य विभागाकडून 26 मे रोजी त्यांचे स्वॅब घेण्यात आले. 

एकामागून एक कोरोनाबाधित आढळू लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वाघिवरे येथे आरोग्य विभागाकडून आशा, आरोग्य सेवक, सेविकांच्या माध्यमातून गावातील कुटुंबाचे सर्व्हेक्षण सुरू झाले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे, तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. लोकांमध्ये कोरोनाविषयी प्रबोधनही केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tale Dayal Area Containment Zone Declared Ratnagiri Marathi News