खड्ड्यांचा अंदाज येईना, वाहनचालक त्रस्त, दुर्घटनेची शक्यता, काय आहे प्रकरण?

नेत्रा पावसकर
Monday, 10 August 2020

प्रशासनाच्या हलगर्जीपणा तसेच इतर अनेक प्रश्‍नांबाबत येथील सामजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले. 

तळेरे (सिंधुदुर्ग) - तळेरे-वैभववाडी या राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू होताच अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले. सध्या या खड्ड्यांत पाणी भरले असल्याने वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणा तसेच इतर अनेक प्रश्‍नांबाबत येथील सामजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले. 

निवेदनात म्हटले आहे, की तळेरे-वैभववाडी राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या मार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली; परंतु पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरी प्रशासनाच्या संबंधित विभागाने या डागडुजीबाबत कार्यवाही केली नाही.

याबाबत माहिती देताना जाधव म्हणाले, ""संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता हा मार्ग महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित महामार्ग प्राधिकरण विभागाकडे चौकशी केली असता हा मार्ग अद्याप महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला नसून त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.

त्यामुळे या मार्गावरील खड्डयांच्या डागडुजीबाबत प्रशासनाच्या कोणत्या विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे? त्याबाबत प्रशासनाच्या कोणत्या विभागाकडे दाद मागावी? या मार्गावरील जीवघेण्या खड्डयांमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? याबाबत प्रशासनाच्या संबंधित विभागाकडून झालेल्या हलगर्जीपणा व हेळसांडपणाबाबत संबंधीतांची योग्य ती चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणार का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्‍नांबाबत वेळीच लक्ष देण्यात यावे, अशी विनंती मी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.'' 

जीवघेणे खड्डे 
सद्यस्थितीत हे खड्डे अत्यंत जीवघेणे ठरत असून त्यामुळे वाहनचालक, प्रवाशी यांच्यासह पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. एखादी गंभीर दुर्घटना अथवा अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे. आगामी गणेश चतुर्थी निमित्ताने या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे या समस्येकडे वेळीच व गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्‍यक आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: talere vaibhavwadi road bad