तळेरे-वैभववाडी रस्ताकाम रोखले 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

तळेरे-वैभववाडी मार्ग खड्ड्यांमुळे वाहतुकीस धोकादायक बनला होता. या मार्गावरील खड्डे बुजविण्यची मागणी होत होती; मात्र कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग विभाग यात हे काम रखडले होते.

तळेरे (सिंधुदुर्ग) - तळेरे-वैभववाडी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने आज सायंकाळी नाधवडे येथे कणकवली सभापती दिलीप तळेकर यांनी हे काम थांबविले. वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा होत नसल्याने अखेर आज यापुढील संपूर्ण काम थांबविण्यात आले. या मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी अनेक वर्षे होत होती. 

तळेरे-वैभववाडी मार्ग खड्ड्यांमुळे वाहतुकीस धोकादायक बनला होता. या मार्गावरील खड्डे बुजविण्यची मागणी होत होती; मात्र कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग विभाग यात हे काम रखडले होते. अखेर आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामाला मंजुरी मिळाली. चार दिवसांपासून खड्डे बुजविण्यचे काम सुरू झाले. 

तळेरेपासून या कामाला सुरुवात झाली. त्याचवेळी हे काम निकृष्ठ होत असल्याचे निदर्शनास येताच, काम थांबविण्यात आले होते; मात्र त्यानंतर काम सुरु करण्यात आले. पुढील कामात कोणतीही सुधारणा नसल्याचे समजताच पुन्हा एकदा हे काम थांबविण्यात आले. या कामाच्या ठिकाणी सबंधित विभागाचे तांत्रिकदृष्ट्या माहिती देणारे कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. 

संबंधितांची उद्धट उत्तरे 
दरम्यान, कामाचा दर्जा पाहून सभापती तळेकर यांनी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला; मात्र त्यांच्याकडून उद्धट उत्तरे मिळाली. कामाच्या ठिकाणी सबंधित विभागाचा अधिकारी उपस्थित राहत नाही. तोपर्यंत नाधवडेच्या पुढील सर्व काम थांबविण्यात आले असल्याचे श्री. तळेकर यांनी सांगितले. यावेळी नाधवडे आणि येथील ग्रामस्थ आणि प्रवाशी उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talere-Vaibhavwadi road work stopped