पावसाचे पाणी साठवणुकीसाठी टाक्‍या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

कुडाळ - तालुक्‍यातील हुमरमळा-भाकाड येथे चिकित्सक समूहाने जलवर्धिनी मुंबईच्या सहकार्याने पाणी साठवण टाकीचा प्रयोग सुरू केला आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून टंचाई दूर करण्यासाठी हे मार्गदर्शक तत्त्व असणार आहे.

कुडाळ - तालुक्‍यातील हुमरमळा-भाकाड येथे चिकित्सक समूहाने जलवर्धिनी मुंबईच्या सहकार्याने पाणी साठवण टाकीचा प्रयोग सुरू केला आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून टंचाई दूर करण्यासाठी हे मार्गदर्शक तत्त्व असणार आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. येथील दऱ्या-डोंगरावरून येणारे पाणी नदी, समुद्र अन्य ठिकाणी जात असल्याने त्या कालावधीत साठवणीच्या दृष्टिकोनातून कोणतेही प्रयत्न न केल्याने जानेवारीनंतर बहुतांशी भागात पाणीटंचाईचा प्रश्‍न उद्‌भवतो. गेली कित्येक वर्षे हा प्रश्‍न निर्माण होत होता. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा अंतर्गत शासनाने तसेच विविध संस्था मंडळांनी उपक्रम हाती घेतले. यशस्वीही केले; मात्र यामध्ये सातत्य नसल्याने पाणीटंचाईचा प्रश्‍न कायम राहिला. मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण टाकीच्या माध्यमातून साठवण करावी. यासाठी गेल्या काही वर्षांपासून मुंबई येथील जलवर्धिनी प्रतिष्ठान संस्था कार्यरत आहे. 

या संस्थेचे ७० वर्षीय जलतज्ज्ञ उल्हास परांजपे यांनी पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने साठवण टाकी हा उपक्रम प्रभावीपणे प्रत्यक्षात आणला आणि यशस्वी केला आहे. सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्याचे नियोजन व्हावे, पाणी साठवण कसे करावे, या अनुषंगाने चिकित्सक समूहाच्या बहुउपयोगी शिक्षण केंद्राने जलवर्धिनीच्या सहकार्याने या स्त्युत्य उपक्रमाकडे वाटचाल केली आहे.

हुमरमळा-भाकाड येथे पाणी साठवण टाकीचे प्रात्यक्षिक केले. हुमरमळा येथील गवंड्यांनी दोन प्रकारच्या टाक्‍या या ठिकाणी श्री. परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधल्या. पावसाळ्यात या टाकीत पाणीसाठवण होऊन त्याचा वापर शेती बागायतीसाठी होऊ शकतो. सुमारे पाच हजार लिटर क्षमता असणाऱ्या सिमेंटच्या टाक्‍या जमिनीची खोदाई करून बांधण्यात आल्या. खर्चसुद्धा अतिशय माफक असून, साधनसामग्री याच ठिकाणी उपलब्ध आहे. हा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अन्य ठिकाणीसुद्धा तो राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
हुमरमळा-भाकाड येथील बांधलेल्या पाणीसाठवण प्रसंगी जलतज्ज्ञ उल्हास परांजपे, सौ. परांजपे, यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माधव पळशीकर, चिकित्सक समूहाचे राजन चव्हाण, प्रियांका वालावलकर, अंकिता चव्हाण, प्रशांत सामंत, संजीवनी खानोलकर, साईप्रसाद पंडित, सिद्धी गोसावी, जयराम नाईक, स्वप्नील यादव, ज्ञानकुंज कॉम्प्युटरचे संचालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: tank for water storage