जलयुक्‍त शिवार अभियानच्या २४ गावांतही टॅंकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

रत्नागिरी - भूजल पातळीत वाढ करून टंचाईतील वाड्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्‍त शिवार अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. या अभियानातील चोवीस गावांना अजूनही टॅंकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. तसेच नऊ गावांमधील भूजल पातळीत मोठी घट झाल्याचे भूजल सर्वेक्षणाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरी - भूजल पातळीत वाढ करून टंचाईतील वाड्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्‍त शिवार अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. या अभियानातील चोवीस गावांना अजूनही टॅंकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. तसेच नऊ गावांमधील भूजल पातळीत मोठी घट झाल्याचे भूजल सर्वेक्षणाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

अनियमित पावसामुळे राज्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र होत आहे. विदर्भ, मराठवाडा भागात हे चित्र भीषण आहे. त्याबरोबर गेल्या तीन ते चार वर्षांत कोकणातील काही भागांमध्ये अशी तीव्रता जाणवू लागली आहे. पाण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना पायपीट करावी लागत आहे.

गावातील हे चित्र दूर करण्यासाठी मुबलक पाण्याबरोबर शेती, फलोत्पादन वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. गेली तीन वर्षे याची अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत पाच टप्प्यांत गावे निवडली गेली असून तेथे विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले.

पहिल्या वर्षी ३१ कोटी ७८ लाख ८० हजार, दुसऱ्या वर्षी १२ कोटी ६३ लाख २४ हजार, तिसऱ्या वर्षी ३ कोटी ९५ लाख ७३ हजार रुपये, तर चौथ्या वर्षी ९३ लाख ४५ हजार रुपये खर्च करण्यात आले. या योजनेतील गावातील टंचाई दूर झाल्याचे संबंधित विभागाकडून सांगितले जात आहे. त्यांपैकी काही गावांत गेल्या पाच वर्षांची तुलना करता पाणीपातळीत घट झाली आहे.

जिल्ह्याची पाणीटंचाई कमी करण्यासाठी प्रशासनात प्रयत्न केले जात आहेत; परंतु जिल्ह्यातील परिस्थिती मात्र जैसे थे आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ५५ गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये २४ गावे ही जलयुक्त शिवार अभियानातील असून सर्वाधिक खेड, संगमेश्वर या तालुक्‍यातील गावांचा समावेश आहे.

भूजल पातळी कमी झालेली 'जलयुक्‍त'तील गावे

  •  दापोली  - कवडोली, हर्णे
  •  खेड - चिंचघर, शिवतर, खवटी
  •  चिपळूण - भोम
  •  रत्नागिरी - खेडशी, मालगुंड
  •  राजापूर  - मोरोशी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tankers in 24 villages of Jalyukt Shivar Abhiyaan scheme