साखरीनाटे बंदरातून तारली, बांगडा गायब ; शिंगाळा झाला कमी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

साखरीनाटे बंदर; पैसे मिळवून देणारे मासे

राजापूर (रत्नागिरी) : निर्यातीतून वर्षभरामध्ये लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल करणारा तारली मासा तालुक्‍यातील साखरीनाटे बंदरासह रत्नागिरी बंदर परिसरातून गतवर्षीपासून गायब झाला आहे. यावर्षी बांगडा माशाची त्यात भर पडली आहे. स्थानिक खवय्यांसह राजधानी दिल्ली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असलेला शिंगाळाही गतवर्षीपासून कमी मिळू लागला आहे. यावर्षीही तो अल्प प्रमाणात मिळत आहे. मच्छीमारांना चांगला ‘पैका’ मिळवून देणारे हे मासे गेल्या तीन वर्षांमध्ये मिळेनासे झाल्याने मच्छीमारबांधव चिंताक्रांत झाले आहेत. 

बांगडा, तारली, शिंगाळा या माशांच्या प्रजाती सागरी किनारपट्टीवरून नेमक्‍या का गायब झाल्या आहेत, याच्या कारणमीमांसेबाबत मच्छीमारबांधवही अनभिज्ञ आहेत. तालुक्‍याच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील साखरीनाटे बंदरामध्ये मासेमारीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

हेही वाचा- सिंधुदु्र्गात निम्म्याहून अधिक बाधितांवर घरीच उपचार -

सातत्याने प्रतिकूल हवामान, वादळी स्थिती आदी कारणांमुळे मासेमारी मुश्‍किल झाली आहे. त्यात मच्छीमार मेटाकुटीस आले. गेल्या काही वर्षांमध्ये परदेशामध्ये निर्यात होणाऱ्या काही माशांच्या प्रजातीचे मासे वर्षभर मिळेनासे झाले आहेत. तारली मासा वर्षभरापासून मिळेनासा झाला आहे. साखरीनाटे बंदरामध्ये वर्षभरामध्ये पंधरा ते वीस लाखांची उलाढाल होणारा बांगडा यावर्षीपासून गायब झाला आहे. शिंगाळ्याचा कॅच कमी झाला आहे. रत्नागिरी भागातून हे मासे गायब झाल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांकडून दिली जात आहे.

रत्नागिरीपासून खाली साखरीनाटे बंदरासह अन्य परिसरातील सागरी किनारपट्टीवर गेल्या तीन वर्षांमध्ये काही प्रजातीचे मासे मासेमारीमध्ये सापडत नाहीत. त्यामध्ये गतवर्षी तारली, तर यावर्षी बांगडा मासा सापडत नाही. सागरामध्ये होणारे विविध बदल, त्यातून निर्माण होणारी प्रतिकूल स्थिती अशा कोणत्या कारणांमुळे गेल्या तीन वर्षांमध्ये या प्रजाती कमी होऊ लागल्या, हे नेमके समजत नाही.
- अमजद बोरकर, मच्छीमार नेते

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tarli Bangada disappeared Sakhrinate port ratnagiri