‘तारली’ने तारले होतेय इतिहासजमा

स्थलांतराला नाही अनुकूलता; समुद्राचे बदलते प्रवाह करतात परिणाम
‘तारली’ने तारले होतेय इतिहासजमा
‘तारली’ने तारले होतेय इतिहासजमाsakal

रत्नागिरी : केरळ किनारपट्टीवर आढळणारा तारली मासा स्थलांतरित होऊन रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर येतो. थव्याने राहणारा मासा गेल्या काही वर्षांत कमी प्रमाणात आढळत आहे. तारली माशासारखे अन्य काही मासेही कमी आढळत असताना नव्या प्रजातीचे काही मासे मिळू लागले आहेत. या बदलत्या मत्स्यप्रकाराचा विचार करताना व चिकित्सक पद्धतीने कारणमीमांसा करताना हवामानातील बदल, वाढते जागतिक तापमान, समुद्राचे बदलते प्रवाह आदींचा विचार प्राधान्याने करणे गरजेचे असल्याचे मत मत्स्य अभ्यासक, संशोधक प्रा. स्वप्नजा मोहिते यांनी व्यक्त केले आहे.

तारलीने तारले, नेहमी घडणे कठीण

तारली मासे हे मोठ्या प्रमाणात केरळ किनाऱ्‍याकडे आढळतात. हे मासे योग्य स्थानांसाठी स्थलांतर करीत काही वेळेस रत्नागिरी किनाऱ्‍याकडे वळतात. हे मासे थव्याने राहणारे असल्याने ते पर्ससीनसारख्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात पकडले जातात. पण, जेव्हा तेथील वातावरण योग्य नसेल तर हे मासे त्या किनाऱ्‍याकडून दुसरीकडे जातात. मासे मिळण्याचे प्रमाण या गोष्टींवरही अवलंबून असते. त्यामुळे तारलीने तारले, असे नेहमी घडणे कठीण.

कभी खुशी- कभी गम

रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर विविध प्रजातींचे मासे विविध हंगामात मिळतात. त्यात गेल्या काही वर्षांपूर्वी सापडत असलेला तारली मासा गेली तीन वर्षे जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मिळत नाही. त्याच्याबरोबर गेल्या काही वर्षांत सुरमई, बांगडा, ढोमावर्गीय मासे, सौंदाळा, काप, कांटा, टायगर, व्हाईट आणि टायनीसारखी कोळंबी असे काही मासे किनारपट्टीवरून कमी होऊ लागले आहेत. त्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना काही मासे नव्याने मिळू लागले आहेत. त्यामध्ये काळतोंड्या म्हणजे ट्रिगर फिश, पॅरट फिश, ब्लू रिंग असे प्रवाळांच्या सान्निध्यात राहणारे मासे किंवा इतर नव्या माशांच्या प्रजाती मासेमारांना मिळू लागल्या आहेत. काही वेळेस बांगडा, घोळ असे मासे अचानक बम्पर प्रमाणात मिळत आहेत. एकंदरीत, माशांच्या बाबतीत मच्छीमारांमध्ये ''कभी खुशी, कभी गम'' अशी काहीशी स्थिती आहे.

काय आहे नेमका तारली मासा

तारली माशाचे ''सार्डिनेला लाँगिसेप्स'' असे शात्रीय नाव असून भारताची पश्‍चिम किनारपट्टी, श्रीलंका, पाकिस्तान, इराण, ओमान, फिलिपिन्स, सोमालिया, व्हिएतनाम आणि येमेन या देशांच्या किनारपट्टीला हा मासा आढळतो. त्यापासून तेल मिळते, म्हणून या माशाला इंग्रजीत ''ऑइल सार्डीन'' असे म्हणतात. त्याचे शरीर लांबट आणि दोन्ही टोकांकडे निमुळते असून दोन्ही बाजूंनी चपटे असते. डोक्यापासून शेपटीपर्यंत पाठीकडची कडा जवळपास सरळ तर पोटाची कडा फुगलेली असते. पोटावरील कडेवर धारदार खवल्यांची रांग असते. पाठीचा रंग काळपट चंदेरी असून त्यात मधून मधून सोनेरी चमक दिसते. पोट रूपेरी असून त्यावर जांभळ्या रंगाची तकाकी असते. पृष्ठपर आणि पुच्छपर हिरवट तपकिरी रंगाचे असतात. सर्वसाधारणपणे हा मासा २०-२३ सेंमी लांब व २०० ग्रॅम एवढ्या वजनापर्यंत वाढतो. मासेमारीत पकडले गेलेले मासे १२-१५ सेंमी लांबीचे असतात. नर आणि मादी यांच्या बाह्यस्वरूपात फरक नसतो. हे मासे थव्याने किनाऱ्‍याजवळ समुद्राच्या वरच्या थरात राहतात.

औषधी गुणधर्मयुक्त तारली

तारली खाण्यासाठी वापरतात. त्याचवेळी या माशांपासून चांगल्या दर्जाचे तेल मिळते. ओमेगा-३ हा घटक असणारे हे तेल औषधी आहेच. या तेलापासून साबण, रंगही तयार करतात. या तेलाचा मार्गारीन, पेंट्स, वार्निश आणि लिनोलियम तयार करण्यामध्ये ही वापरले जाते. तेल वेगळे केल्यानंतर उरलेल्या भुकटीचा वापर पशुपक्ष्यांच्या खाद्यामध्ये पूरक घटक म्हणून करतात. ही भुकटी काही कारणाने खराब झाली तर तिचा खत म्हणूनही उपयोग केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून या माशाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तारलीच्या सेवनातून प्रथिने, ड व ब १२ जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम मिळतात. हृदयविकार आणि अल्झायमर या रोगांवर उपयुक्त असलेली ओमेगा-३ मेदाम्ले मोठ्या प्रमाणावर शरीराला मिळतात. त्यातच, तरळी माशाची चव आणि पोषणमूल्य चांगले असल्याने मानवी आहारात त्याला खूपच महत्त्व आहे.

तयार होतायत ऑक्सिजन विरहित झोन

जागतिक तापमानवाढ होण्यामध्ये पृथ्वीवर वाढणारा कार्बनडाय ऑक्साईड महत्वाचा घटक आहे. समुद्र हा या कार्बनडाय ऑक्साईडचं ''सिंकचं'' म्हणावं लागेल. हवेत वाढणारा हा कार्बनडाय ऑक्साईड वायू समुद्रात विरघळून पाण्याचे आम्लीकरण होते. यामुळे समुद्रात काही ठिकाणी ऑक्सिजनच प्रमाण कमी होऊन ऑक्सिजन विरहित झोन्स तयार होतात. यामुळे त्या क्षेत्रातले जीव मृत होतात किंवा ते झोन्स सोडून दुसरीकडे जातात. मृत झालेल्या जीवांच्या कुजण्याची प्रक्रिया होऊन पुन्हा पर्यायाने कार्बनडाय ऑक्साईडचं प्रमाण आणखी वाढत. त्यातून, तयार झालेल्या ऑक्सिनजन विरहित झोन्सचे प्रमाण सध्या वाढलेलं दिसत आहे.

वाढत्या प्लवंगांचा माशांच्या कल्ल्यावर परिणाम

कार्बनडाय ऑक्साईडचं वाढतं प्रमाण काही जीवांना मात्र उपयुक्त असू शकतं. त्यात काही वनस्पती प्लवंग आणि पेलींळर्श्रीलर .............सारखे जीव या वातावरणात मोठ्या प्रमाणात वाढतात. त्याचा प्रतिकूल परिणाम माशांवर होतो. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या या सूक्ष्म जीवांमुळे माशांचे कल्ले झाकले जातात आणि त्यांना श्वसनाला त्रास होऊ शकतो. अशा कारणांमुळे मासे ते स्थान सोडून इतरत्र स्थलांतर करू शकतात. काही वेळेस हे बदल ज्यांना अनुकूल असतात, असे जलचर या क्षेत्रात येऊ शकतात आणि सूक्ष्म जीव आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे इतर जलचर अशी नवी अन्नसाखळी तिथे वाढू लागते.

मासेमारीतून हजारोंच्या हाताला काम

कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्‍या मच्छीमारी व्यवसायामध्ये हजारो लोकांना विविध प्रकारच्या रोजगार मिळतो. त्यामध्ये खलाशांसह अन्य प्रकारच्या रोजगाराच्या संधींचा समावेश आहे. एका बोटीवर साधारणतः दहा खलाशी असतात. त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून साधारणतः ५० हजार लोकांना दरदिवशी रोजगार मिळतो. या रोजगार निर्मितीच्या माध्यमातून एका बोटीवरील मासेमारी अनेकांच्या हाताला काम आणि उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन बनलेले आहे.

रत्नागिरीपासून खाली साखरीनाटे बंदरासह अन्य परिसरातील सागरी किनारपट्टीवर गेल्या तीन वर्षांत तारलीसह काही प्रजातींचे मासे सापडत नाहीत. दोन वर्षांनंतर यंदा बांगडा मासा काही प्रमाणात सापडू लागला आहे. शिंगाळा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा क्वचित प्रमाणात मिळतो. सागरात होणारे विविध बदल, त्यातून निर्माण होणारी प्रतिकूल स्थिती आदी नेमक्या कोणत्या कारणांमुळे गेल्या तीन वर्षांत माशांच्या या प्रजाती कमी होऊ लागल्या आहेत, मात्र, अशा प्रजाती कमी झाल्यास मासेमारी मुश्कील होईल.

- अमजद बोरकर, मच्छीमार

दृष्टिक्षेपात रत्नागिरी जिल्हा

  • जिल्ह्याची सागरी किनारपट्टी : १६७ कि.मी.

  • माशांची उलाढाल : हंगामात दिवसाला ४.५ कोटी

  • प्रमुख बंदरे : साखरीनाटे, मिरकरवाडा, जयगड, दाभोळ, हर्णै

  • पर्ससीन : २८१, इतर नौका : २८००

एक नजर...

  • ‘तारली’चा मोठ्या प्रमाणात आढळ केरळ किनाऱ्‍याकडे

  • हा मासा गेली तीन वर्षे जिल्ह्याच्या किनारपट्टीवर नाही मिळत

  • टायगर, व्हाईट, टायनीसारखी कोळंबी असे काही मासेही कमी

  • काही वेळेस बांगडा, घोळ मिळतात अचानक बंपर प्रमाणात

  • मासा २०-२३ सेंटिमीटर लांब व २०० ग्रॅम एवढ्या वजनापर्यंत वाढतो

  • थव्याने किनाऱ्‍याजवळ समुद्राच्या वरच्या थरात राहतात

  • तारली खाण्यासाठी वापर; माशांपासून चांगल्या दर्जाचे मिळते तेल

  • ओमेगा-३ हा घटक असणारे हे तेल औषधी

  • आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून माशाला मोठ्या प्रमाणात मागणी

  • तारलीच्या सेवनातून प्रथिने, ड व ब १२ जीवनसत्त्वे, कॅल्शियमही

  • हृदयविकार, अल्झायमरवर उपयुक्त ओमेगा-३ मेदाम्ले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com