esakal | महाराष्ट्रात असंही एक गाव आहे; 'या' गावात कधीच विकला जात नाही चहा 
sakal

बोलून बातमी शोधा

tea not sale in sindhudurg district matond village

चहाचा स्टॉल किंवा हॉटेल तुम्हाला दिसणार नाही असं सांगितलं तर तुमचा विश्‍वास बसणार नाही.

महाराष्ट्रात असंही एक गाव आहे; 'या' गावात कधीच विकला जात नाही चहा 

sakal_logo
By
प्रभाकर धुरी

गाव म्हटलं की टपऱ्या आल्या. तिथे चहाची टपरी असतेच. वाफाळलेला चहा आणि सभोवार गप्पांचा फड असे चित्र प्रत्येक खेड्यात दिसते. पण असेही गाव आहे की, जिथे चहा विकला जात नाही.

कोकणातील एखादा उत्सव असो किंवा कार्यक्रम अथवा गावातील जत्रा, त्यात चहाचा स्टॉल किंवा हॉटेल तुम्हाला दिसणार नाही असं सांगितलं तर तुमचा विश्‍वास बसणार नाही. पण तसं एक गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. वेंगुर्ले तालुक्‍यातील मातोंड हे ते गाव. तिथे कधीच चहा विकला जात नाही. गावातच नव्हे, तर गावाबाहेरही मातोंडमधील व्यक्ती चहाचा स्टॉल घालून चहा विकणार नाही. शेकडो वर्षांची ती परंपरा अनेक पिढ्यांनंतर आजही कायम आहे.

मातोंड हे सावंतवाडी आणि वेंगुर्ले सीमेवरचे तळवडेलगतचे गाव. गावात सगळ्या जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. गावातील अनेक व्यक्ती उच्च पदावर आहेत. गावात अनेक मंदिरे, प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. गावात सुशिक्षित कुटुंबे सर्वाधिक. अनेकजण व्यवसाय नोकरीनिमित्त बाहेर आहेत; पण गावात आला आणि चहा पिण्याची लहर आली तर तुम्हाला चहाचा स्टॉल गावात आढळणार नाही.

तसं पाहिलं तर चहा उत्साहवर्धक, तसाच चहा विक्रीचा व्यवसाय बऱ्यापैकी आर्थिक कमाई करवून देणारा. दिवसागणिक चहा पिणाऱ्यांची संख्या वाढणारी तशीच चहा विक्रीच्या स्टॉल्सची संख्याही वाढणारी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याभोवती असलेल्या प्रसिद्धीच्या वलयाला मोठी किनार आहे ती चहाचीच. ते कशाला, आज अनेक इंजिनिअर अथवा उच्चपदस्थ तरुण नोकरीचा मार्ग सोडून वेगवेगळ्या फ्लेवरच्या चहाचे कॉर्नर शहरात सुरू करून लाखोंची कमाई करत आहेत. महाराष्ट्रातील चहाला इतक्‍या उच्च दर्जाचे स्टेटस्‌ जगभरात प्राप्त झाले आहे. असे असले तरी मातोंडमध्ये चहा विकणे मात्र निषिद्ध आहे.
त्याबाबत अनेक दंतकथा आहेत. बारस म्हणजे पारध करण्याची प्रथा कोकणातील जवळपास सगळ्यांच गावात आहे.

मातोंडमध्येही ती प्रथा शेकडो वर्षांपासून आहे. अवसारी देवाच्या अथवा कौल प्रसादाच्या सूचनेनुसार जंगलात पारधीसाठी गावातील मानकरी जायचे. पारधी आधी श्री सातेरी मंदिरासमोर मोठा मंडप उभारून त्यात पारध करून रानडुक्कर आणल्यावर मोठा उत्सव व्हायचा. एका वर्षी देवाचा मंडप उभारण्याआधी एका व्यक्तीने चहाचा स्टॉल सुरू करून मंडपही उभारला. सगळं जंगल पिंजून काढूनही शिकार पडेना, म्हणून गावकऱ्यांनी अवसारी देव उभा केला, त्यावेळी देवाचा मंडप उभारण्याआधी चहासाठीचा मंडप उभारल्याने अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. तो मंडप तत्काळ हटवण्यात आला आणि त्याच दिवशी शिकार मिळाली आणि बारस परंपरेनुसार झाली. त्या दिवसापासून गावात चहा विकणे बंद झाले.

हे पण वाचा - राज्यात ई-पास रद्द ; 'हे' राहणार बंद अन् 'हे' राहणार सुरू

 दुसऱ्या दंतकथेनुसार गावात आलेल्या पाहुण्यांना हॉटेलात चहा पाजल्यावर मालकाने पूर्वीचे तीन आणि आजचे दोन असा हिशेब सांगितला. पाहुण्यांच्या समोर उधारीचा हिशेब सांगून आपली बेअब्रू केली असे समजून गावात सर्वांनाच चहा विकण्यास मनाई केली गेली. कथा कहाण्या अथवा दंतकथा काहीही असो, गावात पिढ्यान्‌पिढ्या चहा विकला जात नाही हे वास्तव आहे. गावात अनेक दुकाने आहेत. सगळ्या वस्तू तुम्हाला गावात सहज विकत मिळतील; पण चहा मात्र शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच कोकणातील मातोंड गाव इतरांपेक्षा निश्‍चितच वेगळं आहे.

हे पण वाचा - पाच तासाची झुंज अयशस्वी ; आमच्या डोळ्यादेखतच त्याने सोडले प्राण

आजोबा-पणजोबांच्या काळापासून आमच्या गावात चहा विकला जात नाही. इतकेच नाही तर आमच्या गावातील जे ग्रामस्थ नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर आहेत तेही चहा विक्रीचा व्यवसाय करत नाहीत. आमच्या गावात चहा विकत मिळत नसल्याने गावात कुणी पै पाहुणे, आप्तेष्ट मित्र आले तर त्यांना घरी नेऊन चहा दिला जातो. शेकडो वर्षांची ती परंपरा आजही सुरू आहे.

-काका परब, मानकरी, मातोंड 

संपादन - धनाजी सुर्वे