esakal | निकोपता जपण्यासाठी पुरस्कार रद्द ः नाईक
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher Award issue in konkan sindhudurg

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा सर्वच तालुक्‍यांतून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी कमी प्रस्ताव प्राप्त झाले होते.

निकोपता जपण्यासाठी पुरस्कार रद्द ः नाईक

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे देवगड वगळता अन्य तालुक्‍यांतून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रत्येकी दोनच प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यातच काही शिक्षकांनी प्रस्ताव करताना सर्व कागदपत्रे जोडली नव्हती. त्यांना शिक्षण विभागाने विहित मुदत संपली असताना मुदत वाढवून दिली. त्यामुळे प्रस्ताव गुणांकनावर परिणाम होणार होता.

परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकांवर अन्याय होणार होता. कागदपत्रे पूर्ण करण्यास दिलेली परवानगी निवड समितीची मान्यता न घेता देण्यात आली. निकोप व निःपक्षपाती निवडीवर याचा परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर न करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी दिली. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा सर्वच तालुक्‍यांतून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी कमी प्रस्ताव प्राप्त झाले होते.

काही शिक्षकांनी वैयक्तिक संपर्क साधून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रस्ताव सादर करणे शक्‍य नसल्याचेही सांगितले. देवगड वगळता प्रत्येक तालुक्‍यातून केवळ दोनच प्रस्ताव आले. त्या अनुषंगाने 5 ऑगस्टला या पुरस्कारांची निवड यादीची फाईल अंतिम मान्यतेसाठी स्वाक्षरीला आली होती. या फाइलचे अवलोकन केले असता शिक्षण विभागाकडून काही शिक्षकांना अपूर्ण कागदपत्र पूर्ण करण्याबाबत वाढीव मुदत दिल्याचे निदर्शनास आले; मात्र अशा प्रक्रियेमुळे अंतिम गुणांकनावर परिणाम होणार होता.

ज्या शिक्षकांनी विहित मुदतीत परिपूर्ण प्रस्ताव सादर केले, त्यांच्यावरही अन्याय होणार होता. निवड समितीच्या पूर्वपरवानगीशिवाय अशा प्रकारची संधी दिली होती व ती पूर्णपणे चुकीची होती. यामुळे स्पर्धेच्या अंतिम निकालावर त्याचा प्रभाव निर्माण होणार होता. याकरिता सदर निवड प्रक्रिया निःपक्षपाती व निकोप पद्धतीने होण्यासाठी शिक्षण विभागाकडून आलेली यादी अंतिम न करता ही प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले होते. सर्व बाबींचा विचार करता यावर्षीचे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार न देण्याचा निर्णय सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला होता. 

कोरोना योद्‌ध्यांना गौरविणार 
कोरोना कालावधीत सर्व शिक्षकांनी जोखीम पत्करून आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडून प्रशासनाला मोठे सहकार्य केले. त्याकरिता या सर्व कोविड योद्‌ध्यांचा यथोचित सन्मानही जिल्हा परिषदेतर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी व जनतेने याबद्दल चुकीचा समज करून घेऊन नये, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा नाईक यांनी केले. 

..तर गैरसमज झाला नसता 
या संदर्भात शिक्षक संघटना, तसेच सर्वसामान्य जनतेत गैरसमज निर्माण झाला आहे. मुळातच जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे शैक्षणिक चळवळीत योगदान फार मोठे आहे. त्याबद्दल आदर व अभिमान आहे. याबाबत लवकरच सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हा परिषदेचे धोरणही स्पष्ट करेन. वास्तविक कोणत्याही प्रतिक्रिया देताना चर्चा केली असती, तर गैरसमज झाला नसता.  

संपादन- राहुल पाटील

loading image
go to top