शिक्षक बदल्यांचा मार्ग मोकळा, कुणाला लाभ अन् कधी प्रक्रिया?

विनोद दळवी
Saturday, 8 August 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मेमध्ये होणाऱ्या बदल्या खोळंबल्या होत्या; मात्र यात शिथिलता सुरू झाल्यानंतर या बदल्या करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले होते. शिक्षक वगळता अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या 28 जुलैला केल्या होत्या.

ओरोस (सिंधुदुर्ग) - प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 9 व 10 तारखेला समुपदेशन पद्धतीने केली जाणार असून विनंती बदल्या केल्या जाणार आहेत. यासाठी 287 शिक्षकांचे विनंती अर्ज आले आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मेमध्ये होणाऱ्या बदल्या खोळंबल्या होत्या; मात्र यात शिथिलता सुरू झाल्यानंतर या बदल्या करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले होते. शिक्षक वगळता अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या 28 जुलैला केल्या होत्या. दरम्यान, ग्रामविकास विभागानेही शिक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश 5 ऑगस्टच्या पत्राने दिले आहेत.

वाचा - रत्नागिरीत कोरोना स्वॅब टेस्टिंग मशिन बंद पडल्याने तपासणी रखडली 

या आदेशानुसार शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या न करण्याचे निर्देश प्रशासनाला देत शिक्षकांना दिलासा दिला आहे. तर विनंती बदल्याही समुपदेशन पद्धतीने करण्याचे निर्देशित केले आहे. तसेच या बदल्या करताना समानीकरणाबाबत दक्षतेचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाला दिले आहेत. 

कुडाळ, सावंतवाडी, कणकवली या तालुक्‍यात तुलनात्मक कार्यरत शिक्षकांची संख्या जास्त असल्याने या तालुक्‍यातील उपलब्ध होणे कठीण होणार आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना बदली नाकारण्याची वेळ येणार आहे. अथवा अन्य तालुक्‍यात जावे लागण्याची शक्‍यता आहे. अचानक होऊ घातलेल्या या बदली प्रक्रियेबाबत मात्र उत्सुकता लागून राहिली आहे. 

हेही वाचा - सिंधुदुर्गमधील  या तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे घरांसह गोठ्यांचे नुकसान...

संवर्ग एकमध्ये 44, संवर्ग दोन मधील 52, महिलांसाठी अवघड क्षेत्रमधील 19, अवघड क्षेत्र मधील बदली अधिकार प्राप्त शिक्षक 19 असून ही बदली प्रक्रिया 9 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर बदलीपात्र पत्नी-पति एकत्रीकरण 11 आणि बदलीपात्र विनंतीच्या 102 शिक्षकांची बदली प्रक्रिया 10 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे. संबंधित शिक्षकांनी निर्धारीत वेळेआधी 15 मिनिटे उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher transfer process in Sindhudurg