esakal | विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी शिक्षकांची डोंगर कड्यातून पायपीट
sakal

बोलून बातमी शोधा

teachers to learn for students offline study level for 23 students studying under offline study in ratnagiri

पाऊणतासाची पायपीट करत शिक्षक गावात पोचतात आणि शिकवणी वर्ग घेतात.

विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी शिक्षकांची डोंगर कड्यातून पायपीट

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : मोबाईलची रेंज सोडाच पण जंगल भागातून डोंगर-कड्यातून मार्ग काढत माचाळला जाणे म्हणजे दिव्यच. मिनी महाबळेश्‍वर म्हणून ओळखल्या जाणार्‍या लांजा तालुक्यातील या अतिदुर्गम माचाळमध्ये कोरोनाची भिती बाजूला ठेवून 23 विद्यार्थ्यांची ऑफलाईन शिकवणी सुरु झाली आहे. पाऊणतासाची पायपीट करत शिक्षक गावात पोचतात आणि शिकवणी वर्ग घेतात.

माचाळ हा सर्वात दुर्गम भाग आहे. डोंगरातून मार्ग काढत जंगली श्‍वापदांचे दर्शन घेत तेथे जावे लागते. सध्या माचाळला जाण्यासाठी रस्त्याचे काम सुरु आहे; परंतु अजुनही गावात जाण्यासाठी डोंगरातून दीड किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागतेच. माचाळमध्ये सुमारे साडेतीनशेहून अधिक लोकवस्ती आहे. तेथील मुलांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच होते. पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात 23 मुले शिक्षण घेत आहेत. दोन शिक्षक नियुक्त केले आहेत. 

हेही वाचा - सोशल मिडायावरील व्हायलर व्हिडीओमध्ये झालीये छेडछाड 

यंदा कोरोनामुळे शैक्षणिक सत्रात खंड पडला आहे. त्याचा फटका माचाळमधील या अतिदुर्गम भागातील मुलांना बसला आहे. जुन महिन्यात सुरु झालेल्या पावसामुळे शिक्षकांना जाणे अशक्यच होते. ज्या ठिकाणी मोबाईलला रेंज नाही, तिथे ऑनलाईन शिक्षण अशक्यच. त्यामुळे ऑफलाईन शिकवणी हाच एकमेव पर्याय होता. प्रतिकुल परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने माचाळमध्ये शिक्षण सुरु ठेवण्यासाठी पावले उचलली. महिन्याभरापुर्वी प्राथमिक शिक्षक सोहन जानबा वांद्रे व राजेभाऊ बाजीराव खंदारे यांनी ऑफलाईन शिकवणीला सुरवात केली. 

ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर दोन्ही शिक्षक दररोज माचाळला दोन तास वर्ग घेत आहेत. मुलांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि कोरोनाची भिती बाजूला सारत ज्ञान यज्ञ सुरु झाला आहे. गावातील सहाणेजवळील मोकळ्या जागेत सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावून मुलांना शिकवले जाते. दोन शिक्षक असल्याने गर्दी होत नाही. शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांच्यासह उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, संदेश कडव, दत्तात्रय सोपनुर, रविंद्र कांबळे यांनी प्रत्यक्ष माचाळला भेट दिली. मुलांशी संवाद साधत ग्रामस्थांशीही या उपक्रमावर चर्चा केली.

"माचाळसारख्या दुर्गम भागात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी अभ्यासवर्ग सुरु केले आहेत. दोन शिक्षक असल्यामुळे शिकवणी योग्य पध्दतीने सुरु आहे. मुलांच्या प्रगतीसाठीही सुचना केल्या आहेत."

- संदेश कडव, उपशिक्षणाधिकारी

हेही वाचा - रिक्त जागा, भरतीची तार येणार कधी ? 

'सकाळ' बातमीचा सकारात्मक परिणाम 

लांजा तालुक्यातील बिवली येथे सुरु असलेल्या ऑफलाईन वर्गाची बातमी 'सकाळ' मध्ये प्रसिध्द झाली. त्याचा सकारात्मक फायदा शिक्षण विभागाला झाला. त्याचेच फलित म्हणजे माचाळसारख्या दुर्गम गावात ऑफलाईन शिक्षण सुरु झाले आहे. कोरोनामुळे अनेक गावात शिकवण्या सुरु होत नव्हत्या, मात्र बातमीचा परिणाम चांगला झाल्याचे उपशिक्षणाधिकारी कडव यांनी सांगत सकाळचे आभार मानले.

संपादन - स्नेहल कदम 

loading image