रिक्त जागा, भरतीची 'तार' येणार कधी ?

प्रमोद हर्डीकर
Friday, 9 October 2020

लोअर ग्रेड असिस्टंट पोस्टल अधिकारी सुर्वे यांची जागतिक टपाल दिनी खंत

साडवली : जागतिक टपाल दिन साजरा होत असताना देवरुख मधील पोष्ट ऑफिसमध्ये महत्वाची पदे गेली तीन वर्ष रिक्त आहेत व यामुळे ग्राहकांना चांगली सुविधा देता येत नसल्याची खंत लोअर ग्रेड असिस्टंट पोस्टल अधिकारी सुर्वे यांनी व्यक्त केली.
देवरुख सारख्या मुख्य शहरात नगरपंचायत दर्जाच्या शहरात केवळ ७ कर्मचारी हा डोलारा सांभाळत असल्याचे पुढे आले आहे. 

हेही वाचा - रत्नागिरीकिनारी इसिस’च्या हालचाली ; पोलिस यंत्रणा अ‍लर्ट 

संगमेश्वर ग्रामपंचायत हद्दीत ७ कर्मचारी असून देवरुख सारख्या मुख्य पोष्ट ऑफिस कार्यालयातही ७ कर्मचारी आहेत ही तफावत आहे. सात पैकी दोन कर्मचारी आजारपणामुळे रजेवर आहेत यामुळे ग्राहकांना सेवा देताना विलंब होतो. परिणामी ग्राहक रांगेत थांबुन वादविवाद करत आहेत. अपुर्‍या कर्मचारी पदांमुळे ग्राहकांना चांगली सेवा देता येत नाही, असे सुर्वे म्हणाले. 

कोराना काळात देवरुख पोष्ट ऑफिसने चांगली सेवा दिली. मात्र कर्मचारी कमरतेमुळे गर्दी वाढल्याने कोरोना पसरण्याची भीती ग्राहकांमध्ये पसरली होती. पोष्ट ऑफिसमध्ये वीज बीले भरण्याची सुविधा बंद झाल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला. वारंवार नेट बंद असल्यानेही ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. देवरुख परीसरात अल्पबचत ठेवी चांगल्या असतात. या अल्पबचत एजंटना कर्मचारी अपुरे पडत असल्याने वेगळी खिडकी देता येत नाही हा मुद्दा समोर आला.

देवरुख पोष्ट ऑफिसमध्ये गेली तीन वर्ष पोष्टमास्तर एच. जी. वन व सहाय्यक पोष्ट मास्तर एच. जी. टु ही पदे रिक्त आहेत. तसेच पोष्टल असिस्टंटची तीन पदे रिक्त आहेत. ही पदे त्वरीत भरणे गरजेचे आहे. सध्या नवीनच भरती झालेले कर्मचारी हा कार्यभार सांभाळत आहेत.  यामध्ये अनुभवी दोनच कर्मचारीआहेत. संबधित विभागाने यात लक्ष घालावे अशी ग्राहकांची मागणी आहे.

हेही वाचा - कोकणात दादर-सावंतवाडी-दादर ही कोव्हिड स्पेशल ट्रेन 

याबाबत देवरुखचे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी आपण यासाठी पाठपुरावा करु असे आश्वासन दिले आहे. चांगली सेवा देण्यासाठी देवरुख पोष्ट ऑफिस अग्रेसर असताना केवळ रिक्त पदांमुळे ग्राहकांमध्ये असंतोष आहे. हे मोडीत काढण्यासाठी व रिक्त पदे लवकर भरण्यासाठी आपण संबधित विभागाला निवेदन देणार आहे आणि पाठपुरावा करणार आहे असे आर्ते यांनी सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world post day celebrated in sadvali konkan but the number of employees very less for working problematic faced to provide services