esakal | रत्नागिरीत शिक्षकांच्या बदल्या गेल्या लांबणीवर ; का वाचा..
sakal

बोलून बातमी शोधा

teachers transfer delayed in ratngiri

शासनाकडून मार्गदर्शन येईपर्यंत शिक्षकांच्या बदल्या न करता फक्‍त प्रक्रियाच.....

रत्नागिरीत शिक्षकांच्या बदल्या गेल्या लांबणीवर ; का वाचा..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑफलाईन राबविताना अनेक त्रुटी आहेत. त्याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बदल्यांची प्रक्रिया राबविण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशीही मागणी शासनाकडे केली जाणार आहे. शासनाकडून मार्गदर्शन येईपर्यंत शिक्षकांच्या बदल्या न करता फक्‍त प्रक्रिया पूर्ण करून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या लांबणीवर गेल्या आहेत.

हेही वाचा - रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला : चांदेराई बाजारपेठेत भरले पुराचे पाणी ... 

शासनाने १५ टक्‍केच्या मर्यादेत शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन पद्धतीने करण्याबाबत नमुद केले आहे. तथापि २८ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयात बदल्या ऑनलाईन करण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाने ऑफलाईन बदल्या कराव्यात, अशी सूचना दिली होती. या परिस्थितीत संपूर्ण प्रक्रिया राबविताना अनेक अडचणीचे मुद्दे पुढे येत आहेत. कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता समुपदेशनाने शिक्षकांना एकत्र आणता येणार नाही. 

शिक्षकांकडून विकल्प घेऊन प्रक्रिया राबविण्याकरिता खूप वेळ लागू शकतो. संवर्ग २ मध्ये पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत ज्या शिक्षकांची मागील वर्षी बदली झालेली आहे, अशा शिक्षकांची आता बदली करावी का याबाबत निश्‍चितता नाही. त्याचबरोबर ज्या महिला शिक्षिका अतिदुर्गम भागात कार्यरत आहेत, अशा शिक्षिकांना संवर्ग ३ मध्ये प्राधान्यक्रम द्यावा का यावर मार्गदर्शन आवश्‍यक आहे. काही शिक्षण सेविका अतिदुर्गम भागात कार्यरत आहेत, त्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याआधी त्यांना बदली प्रक्रियेत घेण्याबाबत शासनाकडून सुचना मिळणे आवश्‍यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १० ऑगस्टचा कालावधी पुरेसा नाही. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या करण्याकरिता मुदतवाढ मिळावी अशी मागणी आणि विविध मुद्‌द्यांवर मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. 

हेही वाचा -  दर्याला कोकणवासीयांची साद, काय मागीतलय मागणं?

शिक्षकांच्या बदलीविषयी निर्णय घेण्यासाठी आयोजित बैठकीला अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष महेश नाटेकर, शिक्षण सभापती सुनील मोरे, सदस्य बाळकृष्ण जाधव उपस्थित होते. शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर बदलीबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे ही प्रक्रिया राबविताना प्रशासनाला कसरत करावी लागणार असल्याने प्रक्रिया रद्द करण्याचा सूर उमटत आहे; मात्र शिक्षक संघटनांनी प्रक्रिया राबविण्यासाठी सकारात्मक पवित्रा घेतला आहे. 

कागदोपत्री कामे सुरू ठेवण्याचे आदेश
शासनाकडे पाठविण्यात आलेल्या मार्गदर्शनाला उत्तर मिळेपर्यंत शिक्षकांच्या याद्या निश्‍चित करणे, शिक्षकांचे बदली अर्ज स्वीकारणे ही प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. बदल्याची प्रक्रिया १० ऑगस्टपर्यंत पूर्ण करावयाची आहे. मार्गदर्शन मागविण्यात आल्यामुळे या कालावधीत प्रक्रिया होणे अशक्‍य आहे.

संपादन - स्नेहल कदम 

loading image