नातेवाईकांशिवाय गणेशोत्सव, तहसीलदारांचे महत्त्वाचे निर्णय वाचाच

रुपेश हिराप
रविवार, 12 जुलै 2020

यावेळी सरपंचांच्या मागण्या व सूचना त्यांनी जाणून घेतल्या. तहसील कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीला गटविकास अधिकारी वासुदेव नाईक उपस्थित होते. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये ताब्यात घेण्यात येणार आहेत. गणपती कमीत कमी दिवसाचा ठेवावा, भजने करू नये, मुंबईकरांना यावर्षी नातेवाईकांना आणता येणार नाही, अशी सूचना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आज येथील तालुक्‍यातील सरपंचाच्या बैठकीत केल्या. 

चाकरमान्यांनी 7 ऑगस्टपर्यंत गावात यावे, ई-पाससाठी सरपंचाचा दाखला आवश्‍यक असावा, पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कंटेन्मेंट झोन घरापुरता असावा, अशी मागणी उपस्थित सरपंचांनी केली. तहसीलदार म्हात्रे यांनी गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्‍वभूमीवर आज तालुक्‍यातील सरपंचांनी बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी सरपंचांच्या मागण्या व सूचना त्यांनी जाणून घेतल्या. तहसील कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीला गटविकास अधिकारी वासुदेव नाईक उपस्थित होते. 

चर्चेमध्ये गणेशोत्सव किती दिवसाचा साजरा करावा? याबाबत सरपंचांनी प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर गणपती उत्सव हा कमीत कमी दिवसाच्या असावा, असे तहसिलदार श्री. म्हात्रे यांनी सांगितले. कमीत कमी पाच दिवसाचा गणपती सर्वांनी पुजन करावा, असे ते म्हणाले; मात्र सर्वांनी पाच दिवसाचा गणपती पूजन केल्यास विसर्जनावेळी गर्दी उसळेल. त्यामुळे कमी जास्त दिवसाचा गणपती असावा, असे उपस्थित सरपंचाकडून सांगण्यात आले. गणपती समोर असणारी सत्यनारायण महापुजा ही घरगुतीच असावी. भजने केल्याने होणारी गर्दी लक्षात घेता ती टाळून घरच्याघरात आरती करण्यात यावी, असेही म्हात्रे यांनी सुचित केले. 

चाकरमान्यांना सूचना 
गणेश चतुर्थी सणासाठी मुंबई तसेच गोव्यातून येणाऱ्यांसाठी 14 दिवसांचा क्‍वारंटाईन असण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी पुन्हा गावातील शाळा, महाविद्यालयाच्या इमारती ताब्यात घेण्यात येणार आहेत. जो होम क्‍वारंटाईन होईल, त्याला सर्व नियम पाळणे गरजेचे आहेत. ज्याची वेगळी व्यवस्था नसेल त्यांना संस्थात्मक क्‍वारंटाईन केले जाणार. मुंबईकरांनी यावर्षी मित्र मंडळी नातेवाईकांना सोबत आणू नये, शिवाय नवरा-बायको दोघांनीच येऊन हा सण साजरा करावा, असेही तहसीलदार यांनी सांगितले. 

सरपंचांच्या मागण्या 
एखाद्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास त्या घरापुरते कन्टेनमेंट झोन किंवा कमीत कमी परिसरात कन्टेनमेंट झोन असावे, चाकरमान्यांना गावात यायचे असल्यास त्यांना परस्पर पास न देता गावातील सरपंचाच्या दाखला त्यासाठी ग्राह्य धरावा, त्यांनी 15 दिवस आधी म्हणजे 7 ऑगस्टपर्यंत गावात यावे आदी मागण्या उपस्थित सरपंचांनी केल्या. गावातील बीएसएनएलच्या नेटवर्क बाबतीतही अनेकांनी नाराजी व्यक्त करत त्याबाबत संबंधितांचे लक्ष वेधण्याचे आवाहन केले. 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tehsildar Important decisions Ganesh Chaturthi konkan sindhudurg