esakal | तहसीलदारांचे आदेश अन् विरोधकांनी उठविलेल्या आवाजाला यश
sakal

बोलून बातमी शोधा

 Tehsildar orders to stop encroachment removal process

पालिका ही स्वायत्त संस्था असल्याने तहसीलदारांना पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पत्राचा काहीही फरक पडणार नसल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले.

तहसीलदारांचे आदेश अन् विरोधकांनी उठविलेल्या आवाजाला यश

sakal_logo
By
भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेकडून संत गाडगेबाबा भाजी मंडईतील अतिक्रमण हटाओ कारवाईमध्ये भाजी विक्री व फळे विक्रेत्यांच्या केलेल्या स्थलांतरास गणेशोत्सवापर्यंत स्थगिती देऊन "जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे सूचना पत्र तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे विरोधकांसह अनेकांनी उठविलेल्या आवाजाला एकप्रकारे यश आले आहे; मात्र पालिका ही स्वायत्त संस्था असल्याने तहसीलदारांना पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पत्राचा काहीही फरक पडणार नसल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. 

येथील पालिकेने संत गाडगेबाबा भाजी मंडई येथील अतिक्रमण हटाव मोहीम राबवताना भाजी मंडईच्या आवारात बसणाऱ्या भाजी व फळ विक्रेत्यांना स्थलांतरित करताना भाजी मंडईमध्ये जागा उपलब्ध करून दिली होती. एकूणच पालिकेने घेतलेल्या निर्णयानंतर विरोधी गटाच्या नगरसेवकांसह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आदी महाविकास आघाडीकडून तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून विरोध करताना गणेश चतुर्थीच्या तोंडावर भाजीविक्रेत्यांवर केलेली ही स्थलांतराची कारवाई चुकीची असून ते तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

वाचा - सिंधुदुर्गातील `वेटलँड` आता एका क्लिकवर! वाचा सविस्तर... 

सणाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना भाजी मंडईमध्येही जवळजवळ दिलेली जागा पाहता कोरोनाचा धोका निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार नगराध्यक्ष व मुख्याधिकारी राहणार असल्याचे म्हटले होते. 
दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीकडून या भाजीमंडईला भेट देताना त्या ठिकाणी तहसीलदार म्हात्रे यांना पाचारण करताना वस्तुस्थिती दाखवून दिली होती. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स नसल्याचेही तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिले होते. शिवाय स्थलांतरण केल्यामुळे नवीन जागेमध्ये धंदाही होत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट निर्माण येणार असल्याचे तहसीलदारांना सांगितले होते. त्यामुळे भाजी मंडई येथील जागेवरून त्यांना पूर्वीच्या जागेमध्ये पुन्हा बसवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तहसीलदार म्हात्रे यांना निवेदन देताना विक्रेत्यांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर तहसीलदार म्हात्रे यांनी योग्य तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. आज त्यांनी याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना सूचनापत्र दिले असून त्यामध्ये पालिकेने भाजी विक्रेत्यांवर केलेली स्थलांतराची कारवाई गणेश चतुर्थी उत्सवापर्यंत स्थगित करून संबंधित विक्रेत्यांना पुन्हा पहिल्या जागेवर बसवण्यात यावे असे कळवले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू 
दरम्यान, याबाबत नगराध्यक्ष परब त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असता ते म्हणाले, ""पालिका ही एक स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभारामध्ये तहसीलदारांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, शिवाय तो करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या या पत्राचा काही फरक पडत नसून त्यांच्या भूमिकेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार.'' मुख्याधिकारी जिरगे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

संपादन - राहुल पाटील

loading image