उष्म्यामुळे बागायतदारांची डोकेदुखी 

एकनाथ पवार
Thursday, 4 March 2021

हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज कोकणातील आंबा, काजू, सुपारी यांसह विविध फळबागायतदारांची झोप उडविणारा आहे. कोकणात यावर्षी दिवसाबरोबर रात्रीच्या तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहणार आहे. हा अंदाज 1 मार्चपासून तंतोतंत खरा ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - अवकाळी पावसाने तडाखा दिल्यानंतर आता कोकणातील फळ बागायतदारांना तापमान वाढीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. 1 मार्चपासून तापमानात मोठी वाढ झाली असून याचा विपरीत परिणाम आंबा, काजू, सुपारीसह सर्वच फळपिकांच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे अगोदरच विविध समस्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तापमानवाढ ही समस्या डोकेदुखी ठरणार आहे. 

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत उपविभागनिहाय तापमानाचा अंदाज जाहीर केला जातो. यावर्षीचा मार्च ते मे 2021 या कालावधीतील अंदाज हवामानखात्याने नुकताच जाहीर केला आहे. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज कोकणातील आंबा, काजू, सुपारी यांसह विविध फळबागायतदारांची झोप उडविणारा आहे. कोकणात यावर्षी दिवसाबरोबर रात्रीच्या तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहणार आहे. हा अंदाज 1 मार्चपासून तंतोतंत खरा ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

जिल्ह्याच्या तापमानात अचानक वाढ झाली आहे. या वाढलेल्या तापमानाचा मोठा परिणाम जिल्ह्यातील फळपिकांवर होणार आहे. जिल्ह्यातील आंबा, काजू, सुपारीसह अन्य पिकांना नुकताच अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांचा तडाखा बसला. अनेक फळबागायतदार उद्‌ध्वस्त झाले आहेत. झाडांच्या फांद्या मोडणे, फळे गळणे, पाने सुकणे असे प्रकार सध्या अनेक बागांमध्ये पाहायला मिळत आहेत. या संकटातून बाहेर येण्यापुर्वीच आता वाढत्या तापमानाचे महाभयंकर संकट कोकणातील शेतकऱ्यांसमोर उभे राहत आहे. 

चिंता वाढली 
- जिल्ह्यात सध्या 36 ते 38 से. तापमान 
- 15 एप्रिल ते मे अखेर तापमानात वाढ 
- यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उष्मा 
- आंबा, काजूला सर्वाधिक फटका शक्‍य 
- मोहोर जळणे, फळ गळ, डागाची भीती 

काजू उत्पादकांमध्येही धास्ती 
आंब्याप्रमाणे काजू उत्पादकही चिंतेत आहेत. काजुवर देखील या वातावरणाचा मोठा विपरीत परिणाम होणार आहे. काजुला असलेला मोहोर जळुन जाणे, झाडावर असलेली काजु बी वाढ पूर्ण क्षमतेने न होणे, दुबार मोहोर येण्याची प्रकिया थांबणे असे प्रकार तापमान वाढीमुळे होणार आहे. त्याचा एकुणच परिणाम काजू उत्पादनावर होणार आहे. 

बागायतदार समस्यांच्या गर्तेत 
सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ आणि गेल्यावर्षीपासुन असलेले कोरोनाचे सावट अशा असंख्य समस्याच्या गर्तेत आंबा काजु, बागायतदार सापडलेला आहे. त्यातुनही मार्गक्रमण करीत असताना वाढते तापमान हे नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहीले आहे. संकटाच्या चक्रवुहात अडकलेला हा शेतकरी बाहेर पडणार कधी हा खरा प्रश्‍न आहे. 

साधारणपणे 16 ते 32 अंश सेल्सीअस तापमानात काजुवर फारसा परिणाम होत नाही; परंतु ज्यावेळी 37 अंशाच्या इतके तापमान वाढते त्यावेळी नक्कीच त्याचा दुष्पपरिणाम झाडावर होतो. अशा स्थितीत मोहोर, फळे, पाने यावर परिणाम होतो. अशा तापमान वाढीत परागीकरण प्रक्रीया देखील होत नाही. काजुचे झाड स्वतःच स्थिरस्थावर राहण्याचा प्रयत्न करीत असते. परिणामी त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्‍य असल्यास झाडांना पाणी देणे, झाडाच्या बुंध्यात गवताचे आच्छादन करावे. त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. 
- प्रा. विवेक कदम, काजू अभ्यासक, कृषी महाविद्यालय सांगुळवाडी. 

 

अचानक तापमानवाढ झाल्यास आंबा फळातील उच्छवसन क्रियेमुळे फळातील पाणी सालीतील पेशीमार्फत बाहेर जाते. त्यामुळे फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते. ज्या झाडांवर फळे आहेत अशा झाडांना पंधरवड्यातून 150 ते 200 लिटर पाणी विस्ताराप्रमाणे दिल्यास त्याचा उपयोग फळगळ थांबण्यासाठी होईल. याशिवाय आंबा बागेत असलेले गवत, पालापाचोळा आदीचे आच्छादन करावे. हे करताना आग न लागण्याची दक्षता घ्यावी. फळांवर पिशव्याचा वापर करावा. पिशवीमुळे प्रखर सूर्यप्रकाश, कडक उष्णता, परावर्तित उष्णता यापासून फळांचे संरक्षण होईल. 
- डॉ. विजय दामोदर, प्रभारी अधिकारी, आंबा संशोधन उपकेंद्र, रामेश्‍वर देवगड. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temperature rise Sindhudurg district