
या चोरीमध्ये हायस्कूलचे सुमारे 60 हजारांचे नुकसान झाले आहे. चोरटा स्थानिक असल्याचा अंदाज सातार्डा पोलिसांनी वर्तवल्याचे संस्था उपाध्यक्ष बाळा परब यांनी सांगितले.
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलमधील संगणक कक्षेच्या पाठीमागील खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी संगणकाच्या दहा बॅटऱ्या लंपास केल्या. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या चोरीमध्ये हायस्कूलचे सुमारे 60 हजारांचे नुकसान झाले आहे. चोरटा स्थानिक असल्याचा अंदाज सातार्डा पोलिसांनी वर्तवल्याचे संस्था उपाध्यक्ष बाळा परब यांनी सांगितले.
कोरोना पार्श्वभूमीवर आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे नववी व दहावी वर्ग सुरू आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास देत असताना इंटरनेटमध्ये कनेक्शन मिळत नाही म्हणून लिपिक तानाजी खोत व शिपाई शेळके यांनी संगणक कक्ष उघडला असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याची कल्पना मुख्याध्यापक विद्याधर देसाई, संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना दिली. त्यांनी पाहिले असता संगणक कक्षाच्या खिडकीचे दोन लोखंडी गंज तुटलेले होते.
या घटनेची माहिती सातार्डा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली व चोर स्थानिक असावा, असा अंदाज व्यक्त केला. अधिक तपास सातार्डा पोलिस करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच परब यांनी पाहणी केली व चोरट्यास तत्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली.
संपादन - राहुल पाटील