सावधान ! मंडणगडमध्ये दहाजण कोरोना पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी नगरपंचायत कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये असून आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली ठेवले आहे. संपूर्ण नगरपंचायत इमारत परिसराचे निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच कार्यालयातील उर्वरित सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे

मंडणगड ( रत्नागिरी ) - मंडणगड शहर तसेच ग्रामीण भागातील एकूण दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्‍यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. 8 सप्टेंबरला 35 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर दोन अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण दहाजण कोरोना बाधित झाले आहेत. 

पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी नगरपंचायत कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये असून आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली ठेवले आहे. संपूर्ण नगरपंचायत इमारत परिसराचे निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच कार्यालयातील उर्वरित सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांना तातडीच्या कामांसाठी कार्यालयातील कामकाज सुरू राहणार आहे. विनाकारण काम नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे. 

दापोलीत नागरिकांची होणार तपासणी 
दाभोळ -  दापोली शहरात 100 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दापोली शहरातील नागरिकांची प्राथमिक तपासणी नगरपंचायतीकडून करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली आहे. 

दापोली नगरपंचायतीकडून शहरातील प्रत्येक नागरिक, दुकानदार, नोकरदार यांचा कोविडच्या पार्श्‍वभूमीवर सर्व्हे करण्यात येणार आहेत. तसेच ऑक्‍सिमीटर व थर्मामीटर गनच्या माध्यमातून प्राथमिक तपासणीदेखील करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कोविड सर्व्हे व प्राथमिक तपासणी करण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रोडगे यांनी दिली. 

दापोलीत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच दापोली बाजारपेठेत तालुक्‍यातील गावातून येणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने पथकांची स्थापना केली होती; मात्र ही पथके सध्यातरी कुठेही दिसून येत नाहीत. यामुळे विनाकारण गर्दी करणाऱ्या नागरिकांचे फावले आहे. त्यात येथील व्यापाऱ्यांनी "नो मास्क नो सामान' या मोहिमेची घोषणा केली होती; मात्र ही घोषणा हवेतच विरली आहे का? असा प्रश्‍न आता दापोलीकरांना पडला आहे. कारण दापोलीत खरेदीला येणारे मास्क न घालता बाजारात फिरत असून व्यापारीही काही चौकशी न करता सामान देताना दिसत आहेत. 

यामुळे सामान्य नागरिक कोरोनाला घाबरले असून आजारी पडल्यानंतर डॉक्‍टरांकडे जाण्यासाठी भीती वाटत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कोविडची लक्षणे नागरिकांमध्ये नाहीत ना यासाठी दापोली नगरपंचायतीकडून सर्व्हे करण्यात येणार आहे. 

सर्व्हेसाठी नऊ विद्यार्थ्यांची मदत 
या सर्व्हे कामासाठी शहरातील रामराजे महाविद्यालयातील 9 विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना प्रभागातील नगरसेवक व नगरपंचायत कार्यालयातील कर्मचारी सहकार्य करणार आहेत. नागरिकांशी कशा प्रकारे संवाद साधायचा, कोणत्या सूचना द्यायच्या, ऑक्‍सिमीटर, थर्मामीटर गनचा वापर कशाप्रकारे करायचा, याबाबत या विद्यार्थ्यांना दापोली नगरपंचायतीकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten Corona Positive Patient Found In Mandangad